धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:03 IST2025-08-01T10:02:56+5:302025-08-01T10:03:46+5:30
११ वर्षांपूर्वी आलेला सिनेमा, तेव्हा अशी दिसत होती मृणाल

धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स
अभिनेत्री मृणाल ठाकूरची Mrunal Thakur) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आज मृणाल ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. मृणाल मूळची धुळ्याची आहे. मराठी कुटुंबात तिचा जन्म झाला. तिने अभिनयाची सुरुवातही मराठीतूनच केली होती. नंतर तिने हिंदी मालिकेतूनही स्वत:ची वेगळी छाप पाडली. आज ती हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीत आघाडीची अभिनेत्री बनली आहे. पण मृणालचा पहिला मराठी सिनेमा कोणता माहितीये का?
११ वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ साली मृणाल ठाकुरचे एकाच वर्षी तीन मराठी सिनेमे आले होते. ते म्हणजे 'विटी दांडू', 'सुराज्य' आणि 'हॅलो नंदन'. हॅलो नंदन या सिनेमात मृणाल आदिनाथ कोठारेसोबत झळकली होती. सिनेमात त्यांचे रोमँटिक सीन्सही होते. दोघांचं रोमँटिक गाणं आजही व्हायरल होतं. ११ वर्षांपूर्वीचा मृणाल ठाकूरचा लूक पाहून अनेकांचा विश्वासही बसणार नाही. आज मृणालने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. 'सीतारामम' सिनेमामुळे तिला रातोरात लोकप्रियता मिळाली.
मृणालने २०१२ साली 'मुझसे कुछ कहती..ये खामोशियां' या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. या मालिकेसाठी तिने शिक्षणही अर्धवट सोडलं. घरी न सांगताच तिने अभिनयाचं करिअर सुरु केलं. 'मुझसे कुछ कहती..ये खामोशियां' नंतर मृणालला 'कुमकुम भाग्य'ही मालिका मिळाली. यातली तिची बुलबुल ही भूमिका प्रचंड गाजली.
मृणाल ठाकूरने 'लव्ह सोनिया'मधून हिंदी सिनेमात पदार्पण केलं. वेश्या व्यवसाय आणि चाईल्ड ट्रॅफिकिंग या विषयावर हा सिनेमा आधारित होता. या सिनेमाच्या तयारीसाठी ती कोलकतामध्ये राहिली. तिथे तिने रेड लाईट एरियातील महिलांचं आयुष्य जवळून पाहिलं. यानंतर मृणाल हृतिक रोशनसोबत 'सुपर ३०'मध्ये झळकली. इथून तिचं करिअर सुसाट झालं. 'सीतारामम', 'हॅलो पापा', 'जर्सी', 'बाटला हाऊस', 'द फॅमिली स्टार' मध्ये दिसली आणि आता 'सन ऑफ सरदार २', 'डकैत' या सिनेमांमध्ये ती दिसणार आहे.