मराठी सिनेमांना 'अच्छे दिन' येणार, थिएटर्ससाठी होणारी धावाधाव थांबणार! सरकारने आखला 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 21:29 IST2025-02-14T21:28:10+5:302025-02-14T21:29:09+5:30

Marathi Cinema Revival Plan : महाराष्ट्रात मराठी सिनेमांना डावलून हिंदी किंवा इतर भाषेच्या सिनेमांना थिएटर उपलब्ध करून दिली जातात असे आरोप अनेकदा होताना दिसतात.

Marathi cinema will have good days again as rush for theatres will stop Maharashtra Government has drawn up a masterplan | मराठी सिनेमांना 'अच्छे दिन' येणार, थिएटर्ससाठी होणारी धावाधाव थांबणार! सरकारने आखला 'प्लॅन'

मराठी सिनेमांना 'अच्छे दिन' येणार, थिएटर्ससाठी होणारी धावाधाव थांबणार! सरकारने आखला 'प्लॅन'

Marathi Cinema Revival Plan, Single Screen Theatres :  हल्ली ओटीटी प्लॅटफॉर्मचं युग आहे. त्यामुळे सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्यांची ओढ कमी झाली आहे. पण मराठी प्रेक्षक हा सूज्ञ आहे, काही चित्रपट हे सिनेमागृहात जाऊनच पाहण्याचा त्याचा आग्रह असतो. पण थिएटर मिळत नाही ही ओरड गेल्या काही वर्षात प्रकर्षाने दिसून येते. महाराष्ट्रात मराठी सिनेमांना डावलून हिंदी किंवा इतर भाषेच्या सिनेमांना थिएटर उपलब्ध करून दिली जातात असे आरोप अनेकदा दिसतात. यावर तोडगा काढण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने उपाय शोधत आहेत. तशातच आता महाराष्ट्रातील महायुती सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या मंत्रालयाने मराठी सिनेमाला 'अच्छे दिन' आणण्याच्या दृष्टीने एक मास्टरप्लॅन तयार केला आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी मंत्री शेलार यांच्याकडे वेळोवेळी मराठी चित्रपटांना थिएटर न मिळण्याच्या समस्या मांडल्या आहेत. त्यासोबतच आणखी एक समस्या म्हणजे एक पडदा चित्रपटगृहांच्या दुरवस्थेशी संबंधित होती. यातून तोडगा काढण्याचा विचार राज्य सरकार करताना दिसत आहे. आज मंत्रालयातील दालनात सिंगल स्क्रीन थिएटर म्हणजे एक पदडा सिनेमागृह याबाबत चर्चात्मक बैठक घेण्यात आली आणि त्यातूनच एक प्लॅन बनवण्यात आला आहे.

राज्यामध्ये १२०० हून अधिक एक पडदा चित्रपटगृहे असून त्यातील फक्त ४७५ चित्रपटगृहे सुरु आहेत. त्यामुळे उर्वरित सिनेमागृहांच्या सद्यस्थितीबद्दल उपलब्ध माहिती मिळवण्याबाबतचे आदेश मंत्री शेलार यांनी दिले आहेत. यापैकी बंद असलेली चित्रपटगृहे पुन्हा चालू केली जाणार असून, त्या चित्रपटगृहात फक्त मराठी सिनेमाच दाखवला जावा. तसेच या चित्रपटगृहांना सवलती देण्याबाबतच्या स्वतंत्र योजनेचा मसुदा तयार करण्यात यावा, असे आदेश संबंधित विभागाला मंत्री शेलार यांनी दिले आहेत.

येत्या पंधरा दिवसांत या योजनेचा मसूदा सादर करून योजनेसंदर्भात सिने तज्ज्ञ, थिएटर मालक, संबंधित अधिकारी या सर्वांसोबत बैठक घेऊन ही योजना जाहीर करू, असे मंत्री शेलार यांनी सांगितले आहे.

Web Title: Marathi cinema will have good days again as rush for theatres will stop Maharashtra Government has drawn up a masterplan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.