"तो ज्या पद्धतीने…", विद्युत जामवालसोबत काम करताना पूजाला आलेला 'असा' अनुभव, 'जंगली' सिनेमाबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:31 IST2026-04-09T14:30:25+5:302026-04-09T14:31:35+5:30
"मी सलग १० दिवस तिथे...", पूजा सावंतने सांगितला 'जंगली' मध्ये काम करण्याचा अनुभव, विद्युत जामवालबद्दल काय म्हणाली?

"तो ज्या पद्धतीने…", विद्युत जामवालसोबत काम करताना पूजाला आलेला 'असा' अनुभव, 'जंगली' सिनेमाबद्दल म्हणाली...
Pooja Sawant: आपला दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. तिने आतापर्यंत विविध मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा सावंतने हिंदी चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
पूजा सावंतने 'जंगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालसोबत ‘जंगली’ या चित्रपटात तिने स्क्रीन शेअर केली आहे. माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. नुकतीच पूजाने 'महाराष्ट्र टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने जंगली सिनेमात तिचा काम करण्याचा अनुभव कसा होता? याविषयी सांगितलं. तसेच विद्यूत जामवालबाबतही वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत पूजा म्हणाली, "माझ्यावर देवाचा आशीर्वाद आहे हे मी अगदी लहानपणापासून बोलत आले. जंगली हा जो सिनेमा मला मिळाला तो फक्त माझ्यासाठी सिनेमा नव्हता. दुसरी कोणतीही अभिनेत्री त्यानंतर खूप काही करू शकली असती. पण, मी त्या सिनेमातील भूमिकेकडे पाहिलं आणि मला हत्तीबरोबर वेळ घालवायला मिळणार आहे, हाच माझा विचार होता."
त्यानंतर पूजा सावंत म्हणाली,"आम्ही या सिनेमाचं शूट चांगवायला केलं. तेव्हा शूटिंगच्या १५ दिवस अगोदर तिथे गेले. कारण, मला त्या हत्तीणीसोबत मैत्रीचं नातं निर्माण करायचं होतं. तिच्यासोबत मैत्री झाली नसती तर आमचे सीन झालेच नसते. चित्रपटात मी तिला अंघोळ घालते. मी तिच्यावर बसते. तिच्यासोबत जंगलात फिरायला जाते. हे सगळं एका भेटीत नाही होत. ते कनेक्शन असावं लागतं. देवाच्या कृपने माझं तसं प्राण्यांशी कनेक्शन आहे. त्याच्यामुळे ते छान पद्धतीने जमलं. त्यामुळे हा सिनेमा माझ्यासाठी आयुष्यभराचा अनुभव देणारा ठरला."
विद्युत जामवालबद्दल पूजा काय म्हणाली?
जंगली या सिनेमात विद्युत जामवालसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना पूजाने म्हटलं,"विद्युत जामवाल हा एक चांगला सहकलाकार आहे. त्याची लीड म्हणून मला काम करता आलं. सिनेमात मी हत्तींबरोबर काम करत होतेच. पण, आयु्ष्यात डिसीप्लीन काय असतं? हे मी विद्यूतमुळे खूप जवळून पाहिलं. तो ज्या पद्धतीने स्वत:ला मेंटेन करतो. शिवाय तो इतरांना ज्या पद्धतीने प्रेरणा देतो ते सगळं वाखाणण्याजोगं आहे. त्याने मला बऱ्याचदा वर्कआऊटसाठी मार्गदर्शन देखील केलं आहे."
सलग मी १० दिवस तिथे...
"सिनेमाचं शूटिंग करताना मी हॉटेलमध्ये नाहीतर त्या जंगलात राहिले होते. त्यावेळी मला त्या हत्तीणीला भेटायला जंगलात पहाटे जावं लागायचं. तिथे जंगलात एका झाडाखाली छोटंसं गणपतीचं मंदिर होतं.मी रोज तिकडे त्या गणपतीसमोर अर्थवशीर्ष म्हणायचे. त्यानंतर मी ज्या ठिकाणी हत्ती बसलेले असायचे तिकडे जायचे. मग मी माझी जी हत्तीण होती तिच्याकडे जायचे आणि तिला खायला घालायचे. त्यानंतर मग ते सगळे हत्ती पाण्यात पोहोयला उतरायचे. हे सलग मी १० दिवस तिथे केलं.मग माझी आणि त्या हत्तीणीची चांगली मैत्री झाली." असा अनुभव अभिनेत्री शेअर केला.