छाया कदम यांची 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सलग दुसऱ्यांदा हजेरी, म्हणाल्या-"इथे भेटणारी माणसं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 09:15 IST2025-05-16T09:08:57+5:302025-05-16T09:15:01+5:30
'लापता लेडीज' फेम छाया कदम पोहोचल्या कान्सला, 'या' मराठी चित्रपटाचं होणार स्पेशल स्क्रिनिंग

छाया कदम यांची 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सलग दुसऱ्यांदा हजेरी, म्हणाल्या-"इथे भेटणारी माणसं..."
Cannes Film Festival 2025 : फिल्मी दुनियेतील महत्त्वाचा मानला जाणारा कान्स फिल्म फेस्टिव्हलची जगभरात चर्चा आहे. हा फेस्टिव्हल सुरु होऊन नुकतेच काही दिवस उलटले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त हा महोत्सव दरवर्षी उपस्थितांच्या फॅशनने सातत्याने लक्ष वेधून घेतो. वर्षानुवर्षे भारतीय कलाकारही या महोत्सवात उपस्थिती दर्शवत आले आहेत. हा ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव येत्या २४ मे २०२५ पर्यंत चालणार आहे. उर्वशी रौतेला, नितांशी गोयलसह आता मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी देखील कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून, हा महोत्सव ग्लॅमर, प्रतिष्ठा आणि उत्तम सिनेमाचे प्रतीक आहे. छाया कदम यांचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुसरं वर्ष आहे. या सोहळ्यातील काही खास क्षणचित्रे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे. याबाबत नुकतेच सोशल मीडियावर त्यांनी काही खास फोटो शेअर करत लिहिलंय, २०२५ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलचा हा पहिला दिवस. मागच्या वर्षी बरोबर याच दिवशी माझा कान्स मधला पहिला दिवस होता. त्यावेळी अगदी नवखी असल्या सारखी वावरत होते. काही गोष्टींचे उगाचच दडपण घेतलं होतं. पण ते ही मी एन्जॉय केलं होतं. यावर्षी ही जागा - हे शहर आणि इथे भेटणारी माणसं सगळं आपलं आपलं वाटतंय. इथल्या रस्त्यांसोबत - इथल्या रंगीबेरंगी कपडे घातलेल्या माणसांसोबत जुनी ओळख असल्या सारखं वाटतंय.
त्यानंतर पुढे छाया कदम यांनी पोस्टमध्ये म्हटलंय, ठगेल्या वर्षीच्या कान्स फेस्टीव्हल मुळे तयार झालेले कुटुंब यावर्षी अजून विस्तारात गेल्याचे जाणवले. आता उत्सुकता आहे ती आजच्या माझ्या आणि अर्थात आपल्या Snow Flower च्या स्क्रिनिंगची." अशा आशयाची सुंदर पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
दरम्यान, सिनेविश्वातील मानाचा मानला जाणारा कान्स चित्रपट महोत्सव १३ मे पासून सुरू झाला आहे. हा ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव येत्या २४ मे २०२५ पर्यंत चालणार आहे. यंदाच्या महोत्सवात, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर, शर्मिला टागोर, करण जोहर आणि ईशान खट्टर यांसारख्या सेलिब्रिटींचा रेड कार्पेटवर जलवा पाहायला मिळणार आहे.