"भूमिका कोण करतंय हे पाहण्यापेक्षा...", 'छावा'मधील कास्टिंगवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संतोष जुवेकरने सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:39 IST2025-02-07T14:35:36+5:302025-02-07T14:39:48+5:30
मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरबद्दल (Santosh Juvekar) सध्या मनोरंजनविश्वात चांगलीच चर्चा होत आहे.

"भूमिका कोण करतंय हे पाहण्यापेक्षा...", 'छावा'मधील कास्टिंगवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संतोष जुवेकरने सुनावलं
Santosh Juvekar: मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरबद्दल (Santosh Juvekar) सध्या मनोरंजनविश्वात चांगलीच चर्चा होत आहे. याचं कारण 'छावा' चित्रपट ठरलं आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमात तो अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky kaushal) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे अभिनेता प्रसिद्धीझोतात आला आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. परंतु 'छावा'चा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर चित्रपटातील सीन्सवर किंवा कलाकारांच्या कास्टिंगवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर संतोष जुवेकरने भाष्य केलं आहे.
संतोष जुवेकरने नुकतीच 'लोकशाही फ्रेंडली' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने अनेक गोष्टींवर खुलेपणाने भाष्य केलं आहे. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "अक्षय खन्ना यांना चित्रपटात औरंजेबाच्या भूमिकेत कोणी ओळखूच शकत नाही. मुळात ते अक्षय खन्ना आहेत हे कोणाला वाटतच नाही. माझ्या बाबतीत सुद्धा असं झालंय, मी बऱ्याचदा त्यांना ओळखलं नाही, कारण त्यांचा लूक तसा करण्यात आला आहे. म्हणजे त्यावर खूप काम करण्यात आलंय. केवळ ते नावाजलेले अभिनेते आहेत किंवा हिंदीतील कलाकार आहेत म्हणून त्यांना नाही घेतलंय."
पुढे अभिनेत्याने म्हटलंय, "मुळात हा वाद नसावाच. हा फुटकळ वाद आहे. चित्रपटात मराठी कलाकार का नाही घेतले. मग आता मराठीत जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट आला तेव्हा त्यामध्ये अनुप सिंग त्यामध्ये होता. कोण भूमिका करतंय हे पाहण्यापेक्षा ती भूमिका करणारा कलाकार किती योग्य आहे? याकडे लक्ष द्यायला पाहिजे." असं म्हणत अभिनेत्याने ट्रोल करणाऱ्यांना चांगलच सुनावलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा 'छावा' हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. संतोष जुवेकरने 'छावा' मध्ये रायाजी ही भूमिका साकारली आहे.