“मी बाबांसारखा हँडसम दिसत नाही, पण...”, गश्मीर महाजनीने वडिलांबाबत केलेलं वक्तव्य होतं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:41 AM2023-07-15T11:41:47+5:302023-07-15T11:43:14+5:30

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.

marathi actor ravindra mahajani passed away when son gashmeer mahajani said i dont look handsome like dad | “मी बाबांसारखा हँडसम दिसत नाही, पण...”, गश्मीर महाजनीने वडिलांबाबत केलेलं वक्तव्य होतं चर्चेत

“मी बाबांसारखा हँडसम दिसत नाही, पण...”, गश्मीर महाजनीने वडिलांबाबत केलेलं वक्तव्य होतं चर्चेत

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी(१४ जुलै) संध्याकाळी राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘देवता’, ‘आराम हराम आहे’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘बेलभंडार’ अशा सुपरहिट सिनेमांत काम करुन रवींद्र महाजनी यांनी ७० ते ९०चा काळ गाजवला. त्यांच्या मुलगा गश्मीर महाजनीही लोकप्रिय अभिनेता आहे.

रवींद्र महाजनी यांच्याकडे मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट म्हणून पाहिलं जायचं. तर त्यांचा लेक गश्मीर हा सध्याच्या काळातील हँडसम हंक आहे. परंतु, बाबांइतका देखणा दिसत नसल्याचं गश्मीरने एका मुलाखतीत म्हटलं होतं. “बाबा तेव्हाच्या काळात खूप देखणे होते. मी त्यांच्याइतका देखणा दिसतो, असं मला वाटत नाही. हे मी प्रामाणिकपणे सांगतो. पण, मी स्मार्ट आहे. माझा वेगळा चार्म असेल, जो कदाचित मुली आणि मुलांनाही आवडेल. मी बाबांसारखा हँडसम दिसत नाही. म्हणून मला फ्रेश दिसण्यासाठी त्यांच्यापेक्षा जास्त प्रयत्न करावा लागतो. स्क्रीनवर चांगलं दिसण्यासाठी बाबांना कधी प्रयत्न करावा लागला नाही. त्यांना ती दैवी देणगी मिळाली होती,” असं गश्मीर राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता. गश्मीर व रवींद्र महाजनी या पितापुत्राची जोडी 'कॅरी ऑन मराठा' आणि 'देऊळ बंद' या चित्रपटात एकत्र दिसली होती.

“मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव देखणा नट...”, रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अशोक सराफ भावुक

दरम्यान, अभिनेते महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. दरम्यान शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

महाजनी यांचा जन्म बेळगावचा. त्यांचे वडील ह.रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. बालपण मुंबईत. अभिनयाची आवड. लहानपणापासून. नाटकात-चित्रपटातच शाळेच्या स्नेहसंमेलनात काम. खालसा महाविद्यालयामध्ये बी.ए. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली.  शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. 

Web Title: marathi actor ravindra mahajani passed away when son gashmeer mahajani said i dont look handsome like dad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.