Video: आजही गोड आवाज अन् तेच सोंदर्य! अनेक वर्षांनी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळेंना पाहून चाहते सुखावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:44 IST2026-02-08T15:43:40+5:302026-02-08T15:44:46+5:30
एकेकाळी लोकप्रिय असलेल्या अशा अभिनेत्री अनेक वर्षांनी पुन्हा समोर येतात तेव्हा चाहत्यांना चांगलाच आनंद होतो. अशाच अभिनेत्री म्हणजे आशा काळे. अनेक वर्षांनी आशा यांना जाहीर कार्यक्रमात पाहताच चाहते सुखावले आहेत.

Video: आजही गोड आवाज अन् तेच सोंदर्य! अनेक वर्षांनी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळेंना पाहून चाहते सुखावले
मराठी मनोरंजन विश्वात अशा काही अभिनेत्री आहेत ज्या अभिनेत्रींना लोकांनी भरपूर प्रेम दिलं. परंतु वयोमानापरत्वे या अभिनेत्रींनी नंतर सिनेमात काम करणं बंद केलं. एकेकाळी लोकप्रिय असलेल्या अशा अभिनेत्री अनेक वर्षांनी पुन्हा समोर येतात तेव्हा चाहत्यांना चांगलाच आनंद होतो. अशाच अभिनेत्री म्हणजे आशा काळे. अनेक वर्षांनी आशा यांना जाहीर कार्यक्रमात पाहताच चाहते सुखावले आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आशा काळे अनेक वर्षांनी दिसल्या
नुकतंच मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता अथर्व कर्वे आणि अभिनेत्री साक्षी महाजन यांचं लग्न झालं. या दोघांच्या लग्नात इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सहभागी होते. पण विशेष लक्ष वेधलं ते आशा काळे यांनी. गुलाबी साडी परिधान करुन आशा या लग्नाला उपस्थित होत्या. त्यांनी माईकवर अत्यंत गोड आवाजात अथर्व आणि साक्षीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही कलाकारांनी आशा यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. वय वाढलं असलं तरीही आशाताईंच्या चेहऱ्यावरील सौंदर्य आणि उत्साह अजिबात कमी झालेला दिसत नाहीये.
आशा काळे यांच्याविषयी
आशा काळे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९४८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासूनच नाटकांतून काम करायला सुरुवात केली. भालजी पेंडारकर यांच्या 'तांबडी माती' (१९६९) या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 'अष्टविनायक', 'हा खेळ सावल्यांचा', 'बाळा गाऊ कशी अंगाई', 'चुडा तुझा सावित्रीचा', 'देवता', 'बंदीवान मी या संसारी' आणि 'माहेरची माणसं' हे त्यांचे सिनेमे खूप गाजले. याशिवाय 'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकातील त्यांच्या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या आणि प्रेक्षक त्यांना प्रेमाने 'ताई' म्हणू लागले.