"बाळासाहेबांचे डोळे लाल झाले आणि मला म्हणाले..."; अविनाश नारकरांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा
By देवेंद्र जाधव | Updated: April 30, 2025 11:51 IST2025-04-30T11:50:10+5:302025-04-30T11:51:15+5:30
अविनाश नारकर यांनी डॉ. अमोल कोल्हेंच्या राजा शिवछत्रपती मालिकेत शहाजीराजेंची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर अविनाश नारकर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले, तेव्हा काय घडल? याचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे (avinash narkar)

"बाळासाहेबांचे डोळे लाल झाले आणि मला म्हणाले..."; अविनाश नारकरांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा
अविनाश नारकर (avinash narkar) यांनी आजवर विविध मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. अविनाश नारकर यांनी अभिनय केलेलं रणांगण हे नाटक रंगभूमीवर चांगलंच गाजलं. याशिवाय अविनाश यांनी 'राजा शिवछत्रपती' मालिकेत साकारलेली शहाजीराजेंची भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. याच मालिकेदरम्यान अविनाश नारकर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना (balasaheb thackeray) भेटायला गेले तेव्हा काय घडलं, याचा अंगावर शहारे आणणारा किस्सा त्यांनी सांगितला आहे.
आरपार या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अविनाश नारकर म्हणाले की, "बाळासाहेबांनी त्यांना विचारलं की, तुझ्या शिवाजी मालिकेमध्ये शहाजी महाराजांचं काम कोणी केलंय रे? फार अप्रतिम काम केलंय त्याने. इतक्या मोठ्या माणसाने माझी आठवण काढली. आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला लांबून बघितलं आणि म्हणाले.. या, या शहाजी महाराज."
"मी त्यावेळी सहज सुरु केलं आणि म्हणालो की, लढेन मी शस्त्रानेच, शस्त्रविवेक न सोडता. मोडेन मी कायदाही न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी. हिंसा घडेल, हिंस्त्रहिंसकांच्या नाशासाठी, आम्ही होऊ धर्मवेडे, धर्मवेड्यांच्या संहारासाठी, होऊ थोडे असंस्कृत संस्कृतीच्या रक्षणासाठी. जे या मातीत राहतायेत त्यांनी या मातीवर प्रेम करायला शिकायला हवं. कारण ही मातीच तुम्हाला अन्न देते, तुमच्या श्वासांना प्राणवायू देते. आपल्या लेकरांनी चालवलेल्या नांगराच्या फळांनी ती आपला ऊर चिरुन घेते. आणि परत देते, पेरलेल्या तरेख दाण्यागणिक हजार दाणे. म्हणून तिने न मागता तुम्ही द्यायला हवी निष्ठा. ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडायला हवं."
"मी असं म्हटल्याबरोबर बाळासाहेबांचे डोळे लाल लाल झाले. 'अविनाश.. हे साले (शिवी घातली एक) लुंगेसुंगे आजूबाजूला फिरतायत त्या सगळ्यांना...', असं म्हणताच त्यांना ढास लागली. सगळ्यांची धावपळ सुरु झाली. ते पाणी वगैरे प्यायले. बाळासाहेब म्हणाले, 'नाही नाही पंत. ९३ साली केलेलं नाटक आहे, अजूनही संवाद मुखोद्गत आहेत.' मला काही सुचेना. मी त्यांना म्हटलं, बाळासाहेब हे संवाद नाहीत, हे विचार आहेत. हे सावरकरांचे विचार आहेत. हे तुमचे विचार आहेत. हे विचार कसे पुसले जातील.", अशाप्रकारे अविनाश नारकर यांनी खास किस्सा शेअर केला.