"मला जुळं होणार हे कळल्यावर पायाखालची जमीन हलली..."; क्रांती रेडकरने मुलींबद्दल पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:01 IST2025-12-19T08:55:57+5:302025-12-19T09:01:35+5:30
जुळ्या मुलींची आई झालेल्या क्रांती रेडकरने पहिल्यांदाच मनातील भावना व्यक्त केल्या. जेव्हा जुळी मुलं होणार हे समजल्यावर क्रांतीच्या मनाची अवस्था काय होती?

"मला जुळं होणार हे कळल्यावर पायाखालची जमीन हलली..."; क्रांती रेडकरने मुलींबद्दल पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
'जत्रा', 'शिक्षणाच्या आयचा घो' अशा सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. खऱ्या आयुष्यात क्रांतीचं लग्न समीर वानखेडेंशी झालं आहे. क्रांती आणि समीर यांना छबील आणि गोदो या दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती मुलींसोबतचे क्यूट क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अशातच एका मुलाखतीत क्रांतीने जुळी मुलं होणार हे समजल्यावर मनाची अवस्था कशी होती, असा खुलासा केला आहे.
क्रांतीने पहिल्यांदाच केला खुलासा
लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने हा खुलासा केला. क्रांती म्हणाली, ''मी जेव्हा पहिल्या सोनोग्राफीला गेले तेव्हा एवढंच कळलं होतं की, मी प्रेग्नंट आहे. पहिल्या सोनोग्राफीला गेल्यावर ज्या डॉक्टर होत्या त्या पोटावरुन काहीतरी यंत्र फिरवत होत्या. त्यावेळी डॉक्टर म्हणाल्या, सर्व ठीक वाटतंय.''
''नंतर डॉक्टरांनी मला बघायला सांगितलं आणि म्हणाल्या, बेबी नंबर १ ठीक आहे. आणि बेबी नंबर २ दोघेही ठीक आहेत. हे ऐकताच बेबी नंबर १, २ हे काय आहे? मला ट्विन्स होणार आहेत का? असं मी डॉक्टरांना विचारलं. मग त्यांंनी थंडपणे माझ्या म्हणण्याला होकार दिला. डॉक्टर शांत होत्या पण माझ्या पायाखालची जमीन जवळपास हलली होती.'', अशाप्रकारे क्रांतीने मनातील भावना व्यक्त केल्या.
क्रांतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती सध्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत नाहीये. तिने 'जत्रा', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'खो खो', 'किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी', 'शुगर सॉल्ट आणि प्रेम', 'ट्रकभर स्वप्न' अशा सिनेमांमध्ये झळकली आहे. क्रांतीने 'कांकण' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. क्रांती सध्या सिनेसृष्टीत काम करत नसली तरीही ती सोशल मीडियावर सक्रीय आहे.