"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:29 IST2025-10-07T14:26:57+5:302025-10-07T14:29:42+5:30
सचिन पिळगावकरांनी उर्दू भाषेवरील त्यांचं प्रेम जाहीरपणे मांडलं आहे. त्यामुळे सचिन यांच्या नव्या विधानाची चांगलीच चर्चा आहे

"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
सचिन पिळगावकर त्यांच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतात. त्यामुळे सचिन यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. अशातच सचिन पिळगावकर एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे त्यांच्यासोबत शेखर सुमन आणि इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. त्यावेळी माझी मातृभाषा मराठी असली तरी मी उर्दू भाषेत विचार करतो, अशा शब्दात सचिन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाले सचिन पिळगावकर? जाणून घ्या
सचिन यांचं उर्दू भाषेवर प्रेम, म्हणाले-
सचिन पिळगावकर नुकतंच बहार ए उर्दू या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी भावना व्यक्त करताना सचिन पिळगावकर म्हणाले की, ''माझी मातृभाषा मराठी आहे पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला माझ्या बायकोने किंवा कोणीही रात्री ३ वाजता जरी उठवलं तरी मी उर्दू बोलून जागा होतो. मी केवळ उर्दूतून जागा होत नाही तर मी उर्दूसोबत झोपतोही. माझं उर्दू भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं.'' अशाप्रकारे सचिन यांनी वक्तव्य केलं. अभिनेते शेखर सुमन यांनीही सचिन यांच्या म्हणण्याला दाद दिली.
सचिन पिळगावकर हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी हिंदी ओटीटीविश्वात त्यांच्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला. सचिन यांनी गेल्या काही वर्षांमध्ये 'नवरा माझा नवसाचा २', 'सिटी ऑफ ड्रीम्स' यांसारख्या सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये काम केलंय. सचिन यांच्या प्रत्येक कलाकृतीचं आणि भूमिकेचं कौतुक होताना दिसतं. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी 'शोले', 'बालिका वधू', 'नदिया के पार', 'अवतार', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या सुपरहिट हिंदी सिनेमांमध्ये दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलंय. त्यामुळेच उर्दू, हिंदी भाषेवर त्यांची पकड आहे.