सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार भव्य चित्रपट महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:10 IST2025-07-23T16:08:30+5:302025-07-23T16:10:07+5:30

मराठी तारकांच्या उपस्थितीत या तारखेला कॅलिफोर्निया येथे खास महोत्सव रंगणार आहे

A grand Marathi film festival will be held at The California Theater in San jose | सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार भव्य चित्रपट महोत्सव

सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार भव्य चित्रपट महोत्सव

राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेत्या 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' (NAFA) या संस्थेची स्थापना गेल्यावर्षी अमेरिकेत झाली. हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा भव्य सोहळा प्रथमच त्यांनी आयोजित करून सर्वांचे लक्ष वेधले होते.

मराठी चित्रपटांचा परदेशात साजरा होणारा हा एकमेव सोहळा असून यावर्षी हा सोहळा अधिक भव्य, व्यापक आणि उत्साही स्वरूपात २५ ते २७ जुलैदरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथील 'द कॅलिफोर्निया थिएटर' या आलीशान ठिकाणी संपन्न होत आहे. मराठी कलावंतांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा दोन दिवसांचा महोत्सव यंदा रसिकांच्या मागणीमुळे तीन दिवसांचा होत आहे.

पहिल्या दिवशी म्हणजेच २५ जुलैला रेड कार्पेट रिजिस्ट्रेशन झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातून रेड कार्पेट एन्ट्री दिली जाणार आहे, त्यानंतर ‘फिल्म अवार्ड्स नाईट’या ग्लॅमरस पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होईल. लोकप्रिय मराठी कलावंतांसोबत भेटण्याची, बोलण्याची त्यांच्यासोबत छायाचित्रे काढण्याची संधी अमेरिकेतील रसिक प्रेक्षकांना या फिल्म अवार्ड नाईटमध्ये मिळणार आहे. या फिल्म अवार्ड नाईटमध्ये कलावंतांचे स्वागत त्यांना विविध पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. अमेरिकेतील स्थानिक कलावंत आणि तंत्रज्ञ यांचाही या सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ जुलै रोजी मुख्य फेस्टिव्हलची सुरुवात मेन थिएटरमध्ये उपस्थितांच्या नोंदणी कार्यक्रमानंतर अभिनेते सचिन खेडेकर रसिकांची संवाद साधत त्यांना काही महत्वाच्या 'कि नोट्स' देतील व त्यानंतर ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर्स’ अंतर्गत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई', 'स्नोफ्लॉवर'चा शो झाल्यानंतर अभिनेते स्वप्नील जोशी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या 'स्नोफ्लॉवर' फायर साइडचे कुतूहल जागविणारा रंगारंग कार्यक्रम सादर करतील. यानंतर 'नाफा'ची निर्मिती असलेल्या 'सबमिशन', 'योगायोग' आणि 'द गर्ल विथ रेड हॅट' या लघुपटांचे प्रीमियर शो होतील.

त्यानंतर अमेरिकेतील स्थानिक कलावंतांसोबत 'पॅनल डिस्कशन' होणार असून त्यात श्रीयुत मिरजकर, हर्ष महाडेश्वर, संदीप करंजकर यांच्याशी मॉडेरेटोर डॉ. गौरी घोलप संवाद साधणार आहेत. यानंतरचे विशेष आकर्षण म्हणजेच 'ऐवज' या जेष्ठ अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या चरित्रग्रंथाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नव्या आवृत्त्यांचे प्रकाशन 'नाफा'मंचावर झाल्यानंतर अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची 'फायर साईड' जाणून घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. या रंगारंग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात लेखक दिग्दर्शक विक्रम वाटवे करणार असून वरील सर्व कार्यक्रम मुख्य थिएटरमध्ये होणार आहेत.

त्यासोबतच २७ जुलैच्या कार्यक्रमांची सुरुवात 'फेस्टिवल ओपनिंग पार्टनर्सना पुरस्कृत केली जाईल. त्यानंतर ‘नाफा’ विनिंग 'शॉर्टफिल्म्सचे स्क्रिनिंग होणार असून त्यामध्ये ‘डंपयार्ड’, 'राडा', 'बिर्याणी' या तीन शॉर्टफिल्म्स पहायला मिळणार आहेत. त्यापाठोपाठ 'छबिला', 'रावसाहेब' आणि 'प्रेमाची गोष्ट २' या मराठी चित्रपटांचे 'नाफा वर्ल्ड प्रीमियर' होतील.

तसेच 'स्टुडंट स्पॉटलाईट' विभागातील शॉर्टफिल्म 'चेंजिंग रूम', 'रेबेल', 'काजू कतली' आणि 'द अनाटॉमीय ऑफ द डे' यांचे विशेष स्क्रिनिंग होणार आहे. या भरपेट मनोरंजनासोबतच सन्मानीय जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर, मधुर भांडारकर, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सचिन खेडेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे व वैदेही परशुरामी यांच्यासोबत पॅनल डिस्कशन होणार आहे.

त्यासोबतच दोन्ही दिवशी म्हणजे २६ आणि २७ जुलैला इतर सभागृहांमध्येही अत्यंत विलोभनीय अश्या कार्यक्रमांचे आयोजन 'नाफा'ने केले आहे. २६ जुलैला 'लय, कथा आणि निर्भीड सत्य' यावर गायक संगीतकार अवधूत गुप्ते, 'चित्रपटांमध्ये कथनात्मक प्रभाव वाढविण्यासाठी कलात्मकता, इमोशन्स सोबत तंत्रज्ञानाचा वापर' यावर डॉ. पराग हवालदार, 'क्रॉसिंग बॉर्डर्स: सिनेमा आणि स्थलांतर यांच्यातील जीवन' यावर प्रख्यात अभिनेत्री अश्विनी भावे बोलणार आहेत.

याशिवाय 'मराठी चित्रपटातली विनोदी आणि अद्भुत दुनिया' हा विषय घेऊन महेश कोठारे, 'गोष्ट आणि दिग्दर्शनातून वास्तववादी चित्रपटाची पायाबांधणी करताना' या अत्यंत महत्वाच्या विषयावर मधुर भांडारकर यांचे मास्टर क्लास विशेष आकर्षण ठरणार आहेत. २७ जुलैला 'सो कुल लाईफ' : अर्थात अ जर्नी विथ सोनाली कुलकर्णी' त्यांच्यानंतर 'अभिनयातील स्थित्यंतरे' कशी असतात यावर स्वप्नील जोशी, 'व्हाइस, प्रेझेन्स आणि ट्रुथ' बद्दल सचिन खेडेकर आणि 'कॅमेऱ्यामधून आयुष्याकडे बघताना' नेमका काय दृष्टीकोन हवा याबद्दल डॉ. मोहन आगाशे त्यांच्या खुमासदार शैलीत मास्टर क्लास घेणार आहेत.

त्यासोबतच या महोत्सवात रसिक प्रेक्षकांना २६ आणि २७ जुलै या दोन्ही दिवशी त्यांच्या आवडत्या कलावंतांसोबत 'मीट अँड ग्रीट' मध्ये सहभागी होता येणार आहे.२६ जुलैला 'लाईट्स कॅमेरा कथ्थक' यावर वैदेही परशुरामी, 'फिल्म, फेम आणि फार्म फ्रेश'यावर अश्विनी भावे, 'स्टोरीज दोज्  मॅटर' बद्दलचे रहस्य सोनाली कुलकर्णी सांगतील, त्यासोबत रोमान्स, रोल्स अँड द रिअल स्वप्नील नेमका कसा आहे हे खुद्द स्वप्नील जोशी कडून जाणून घेता येईल तसेच बियॉंड द स्पॉटलाईट बद्दलचे आकर्षण कसे असते याबद्दल दस्तूरखुद्द सचिन खेडेकर सांगतील.

त्यासोबतच २७ जुलैच्या दिवशी 'ट्रॅडीशन मिट्स ट्रेंड्स' यावर अवधूत गुप्ते, तर 'अनफिल्टर्ड मधुर' कसे आहेत? हे प्रत्यक्ष मधुर भांडारकर यांच्याकडूनच ऐकायला मिळणार आहे. तसेच 'कोठारे अँड सन्स : अ फिल्मी फॅमिली अफेअर' स्वतः महेश कोठारे जबरदस्त माहिती सांगणार आहेत. नंतर त्यांचे चिरंजीव आपल्या सर्वांचा लाडका आदिनाथ कोठारे 'बॉर्न टू बी ऑन सेट' बद्दलचं कुतूहल जागवणार आहे. 

वर्षी खास या युवा पिढीला आकर्षित करणारे 'क्रिएटर्स मीट-अप' विशेष विभाग असणार आहे. २६ जुलै रोजी दु. १ ते २ वाजता, आदिनाथ कोठारे यांच्या सोबत आदित्य पटवर्धन तर २७ जुलै रोजी वैदेही परशुरामी यांच्याशी हर्ष महाडेश्वर तरुण कलावंतांमधील कलागुणांच्या नवलाईबद्दल संवाद साधतील आहे. यासोबतच व्हाइस आर्टिस्ट आणि अभिनेते प्रसाद फणसे यांचे दोन्ही दिवस 'डबिंग वर्कशॉप्स' सुरु राहणार असून ते 'जाहिरातींचे डबिंग', 'चित्रपटांचे डबिंग' आणि 'ऍनिमेशन फिल्मचे डबिंग' कसे करावे याबद्दल प्रशिक्षण देणार आहेत. या सोबतच फेस्टिव्हलमध्ये तिन्ही दिवस 'चित्रपट एक्स्पो' सुरु असणार आहे. या 'नाफा मराठी चित्रपट महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

Web Title: A grand Marathi film festival will be held at The California Theater in San jose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.