समुद्राच्या बाजूला झोपडीत राहायची वनिता खरात, म्हणाली- "एकदा लाट आली घराची भिंत कोसळली आणि..."
By कोमल खांबे | Updated: November 6, 2025 18:47 IST2025-11-06T18:47:19+5:302025-11-06T18:47:55+5:30
"आम्ही जेवायला बसलेलो, लाट आली आणि घराची भिंत कोसळली...", बालपणाबद्दल बोलताना वनिता खरात भावुक

समुद्राच्या बाजूला झोपडीत राहायची वनिता खरात, म्हणाली- "एकदा लाट आली घराची भिंत कोसळली आणि..."
वनिता खरात हा महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा लाडका चेहरा. अभिनयाची जिद्द आणि टॅलेंटने वनिताला बॉलिवूडपर्यंत पोहोचवलं. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांना हसवणारी वनिता शहीद कपूरसोबत कबीर सिंग या बॉलिवूड सिनेमातही झळकली. पण, वनिताचा इंडस्ट्रीत करियर करण्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतलेल्या वनिताला लहानपणापासूनच अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
वनिताने MHJ पॉडकास्टमध्ये तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. वनिता म्हणाली, "माझं घर समुद्राच्या कडेला म्हणण्यापेक्षा समुद्रात आहे असं मी म्हणेन. माझं १० बाय १०चं घर अजूनही वरळी कोळीवाड्यात आहे. आमच्या बाथरुमचा पाइप हा डायरेक्ट समुद्रात असतो. आधी घराच्या मागे बांध नव्हता. ज्यावेळी खूप भरती यायची तेव्हा त्या बाथरुममधून पाणी बाहेर यायचं आणि वाळू यायची. कपाटं सगळी खाली असल्यामुळे पुस्तकं वगैरे भिजायची. ते पाणी आम्ही काढायचो. २६ जुलैच्या वेळी तर आमच्या घरात गुडघ्याएवढं पाणी होतं. पाऊस कधी कमी होतोय याची आम्ही वाट बघत बसलेलो. आमचं घर म्हणजे झोपडी होती. मला आठवतंय शाळेत जाण्यासाठी आम्ही तयार होत होतो आणि जेवायला बसलो होतो. तेव्हा लाट आणि अख्खं घर तुटलं होतं. तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. नंतर आम्ही मग घर बांधलं".
"माझी आई घरकाम करायची आणि बाबा ड्रायव्हर होते. पण मी ते बालपण खूप एन्जॉय केलंय. चाळीसारखी माणसं जगात कुठे भेटत नाहीत. घराचं छप्पर गळायचं. त्यामुळे घरात छप्पर गळायचं तिथे बादल्या पातेली लावायचो. आणि मग राहिलेल्या जागेत झोपायचो. नंतर आम्ही मग घर वन प्लस वन केलं. त्यामुळेच मी कुठेही अॅडजस्ट करू शकते. त्या घरात आम्ही १० जण राहायचो पण ती मज्जाच वेगळी होती", असंही वनिता म्हणाली.