KBC 17: इशित भटची दुसरी बाजू, बिग बींजवळ केलेली फोटो काढण्याची विनंती, अमिताभ म्हणाले- "तू आता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:02 IST2025-10-19T12:01:08+5:302025-10-19T12:02:52+5:30
उद्धट वर्तन केल्यामुळे टीकेचा धनी बनलेल्या इशित भटची दुसरी बाजू समोर आली आहे. त्यामुळे नेटकरी थक्क झाले आहेत. काय घडलं होतं?

KBC 17: इशित भटची दुसरी बाजू, बिग बींजवळ केलेली फोटो काढण्याची विनंती, अमिताभ म्हणाले- "तू आता..."
'कौन बनेगा करोडपती १७ जूनियर्स' मध्ये काही दिवसांपूर्वी १० वर्षांचा स्पर्धक इशित भट सहभागी झाला होता. त्याच्या उद्धट स्वभावामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी इशितवर जोरदार टीका केली. इशितला अतिआत्मविश्वासामुळे काहीही रक्कम न जिंकता खेळातून बाद व्हावं लागलं. रामायणासंबंधी सोप्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही. शिवाय त्याने बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनामुळे प्रेक्षकांनी त्याच्यावर खूप टीका केली. अशातच इशितची दुसरी बाजू समोर आली आहे. जेव्हा त्याने बिग बींकडे फोटो काढण्याची विनंती केली होती.
इशित भटची दुसरी बाजू पाहून नेटकरी थक्क
इशित भटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत इशित भटची प्रेमळ बाजू दिसतेय. इशित भट बिग बींना म्हणतो, ''सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. तुमचा वाढदिवस जवळ येतोय. पण मी इथून निघून जाईल त्यामुळे मी तुमच्यासोबत फोटो काढू शकत नाही. सर मला सांगण्यात आलंय की, जर मी १२.५० लाखांच्या वर रक्कम जिंकली तरच माझ्यासोबत तुम्ही फोटो काढाल. पण त्याआधीच मी आऊट झालो तर तुमच्यासोबत मी फोटो नाही काढू शकत.''
यावर अमिताभ म्हणाले- ''असं काही नाही. तुम्ही माझ्यासोबत जरुर फोटो काढू शकता. अजिबात घाबरु नका. आधी ह्यांच्यासोबत माझा फोटो काढा. या तुम्ही इथे. तुम्ही बोलत होतात की, मी फोटो नाही काढणार. फोटो तर झाला'', अशाप्रकारे इशित भटची दुसरी बाजू पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. इशित भट कितीही उद्धट वागला तरी तो फक्त १० वर्षांचा होता. त्यामुळेच अजाणतेपणी त्याने बिग बींसोबत वेगळं वर्तन केलं, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याची बाजू घेतली. याशिवाय इशित भटच्या गैरवर्तनाला अमिताभ यांनी ज्या शांतपणे हाताळलं, त्याविषयी अमिताभ यांचंही नेटकऱ्यांनी कौतुक केलं.