५७ वर्षांचा लोकप्रिय गायक आठव्यांदा होणार बाबा; ३१ वर्षांनी लहान पत्नीने दिली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:58 IST2026-01-30T11:56:34+5:302026-01-30T11:58:30+5:30
मनोरंजन विश्वातून एक गुड न्यूज आली आहे. हॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मार्क अँथनी आणि त्याची पत्नी नादिया फरेरा यांच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे

५७ वर्षांचा लोकप्रिय गायक आठव्यांदा होणार बाबा; ३१ वर्षांनी लहान पत्नीने दिली गुडन्यूज
मनोरंजन विश्वातून एक गुड न्यूज आली आहे. हॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मार्क अँथनी आणि त्याची पत्नी नादिया फरेरा यांच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. या जोडीने आपल्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून नादिया गरोदर असल्याची घोषणा केली आहे. ५७ वर्षीय मार्क अँथनी आता आठव्यांदा बाप बनणार असल्याने सोशल मीडियावर त्यांचे जोरदार अभिनंदन होत आहे.
मार्क आणि नादिया यांनी इन्स्टाग्रामवर एक गोड फोटो शेअर करत ही माहिती दिली. या फोटोमध्ये नादिया आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असून त्यावर मार्क आणि त्यांच्या पहिल्या मुलाचा हात दिसतोय. "लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आमचा मुलगा मार्क्विटो आता मोठा भाऊ होणार आहे," असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. या दोघांना २०२३ मध्ये पहिला मुलगा झाला होता आणि आता हे त्यांचे दुसरे अपत्य असेल.
मार्क अँथनी हा जगातील सर्वाधिक अल्बम विकला जाणारा साल्सा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक ग्रॅमी पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. मार्कच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, हे त्याचे चौथे लग्न आहे. याआधीच्या पत्नींपासून त्याला सहा मुले आहेत, ज्यामध्ये एका दत्तक मुलाचाही समावेश आहे. नादिया फरेरा ही पॅराग्वेची प्रसिद्ध मॉडेल असून तिने २०२१ मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.
या बातमीनंतर हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम यानेही कमेंट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. मार्क आणि नादिया यांच्या वयात ३१ वर्षांचे अंतर असूनही ही जोडी नेहमीच आपल्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत असते. आता त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन पाहुण्यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.