धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:32 IST2025-12-15T12:28:23+5:302025-12-15T12:32:07+5:30
पोलिस सध्या चोरी आणि हत्या प्रकरणात या घटनेची सखोल तपासणी करत आहेत.

धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक रॉब रेनर आणि पत्नी मिशेल रेनर यांचा घरातच मृतदेह आढळून आला आहे. रविवारी दुपारी लॉस एंजिलिसच्या ब्रेंटवुड स्थित घरात दोघंही मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी या घटनेचा तपास करताना हे प्रकरण दुहेरी हत्याकांड असल्याचं सांगितलं आहे. लॉस एंजिलिस पोलिस सध्या चोरी आणि हत्या प्रकरणात या घटनेची सखोल तपासणी करत आहेत.
१४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.४० वाजता चाडबोर्न एव्हेन्यू स्थित एका घरात मेडिकल इमर्जन्सी असल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. घरात ७८ वर्षीय पुरुष आणि ६८ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या शरीरावर धारदार चाकूने हल्ला केल्याचे घाव दिसले. सुरुवातीला मृतांची ओळख गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र नंतर दिग्दर्शक रॉब रेनर आणि पत्नी मिशेल रेनर यांचं नाव समोर आलं आणि सर्वांना धक्काच बसला. दोघांचा मृत्यू नक्की कोणी केला? चोरी की अन्य कोणत्या कारणाने त्यांची हत्या झाली असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये, रॉब आणि मिशेल यांच्या मुलानेच त्यांची हत्या केल्याचा दावा केला गेला आहे.
रेनर यांच्या कुटुंबाने अधिकृत स्टेटमेंट जारी करत लिहिले, "आम्हाला हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की मिशेल आणि रॉब रेनर यांचं निधन झालं आहे. या अचानक झालेल्या घटनेने आम्ही धक्क्यात आहोत. या कठीण प्रसंगी आम्हाला प्रायव्हसी द्यावी ही विनंती."
रॉब रेनर हे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. १९७० साली पहिल्यांदा सिटकॉम 'ऑल इन द फॅमिली'मध्ये मायकल 'मीटहेड' स्वीटिकच्या भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली होती. यासाठी त्यांना दोन वेळा ग्रॅमी अवॉर्डही मिळाला. नंतर त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. 'व्हेन हॅरी मेट सैली'हा त्यांचा गाजलेला सिनेमा होता.