४६ वर्षीय अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य संपवलं; सिनेसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 10:05 IST2025-12-22T10:03:24+5:302025-12-22T10:05:06+5:30
प्रसिद्ध अभिनेत्याने राहत्या घरी स्वतःचं आयुष्य संपवल्याने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे

४६ वर्षीय अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य संपवलं; सिनेसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता जेम्स रॅन्सोनचे (James Ransone) वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी निधन झाले आहे. लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनरच्या प्राथमिक माहितीनुसार, जेम्सचा मृत्यू शुक्रवारी झाला असून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. जेम्सच्या निधनामुळे संपूर्ण हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
जेम्स रॅन्सोनला प्रामुख्याने एचबीओच्या गाजलेल्या 'द वायर' या क्राईम ड्रामा सिरीजमधील 'चेस्टर जिग्गी सोबोटका' या भूमिकेसाठी ओळखले जाते. सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्याने साकारलेला हा गुंतागुंतीचा डोक वर्कर प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. याशिवाय, २०१९ मध्ये आलेल्या 'इट: चॅप्टर टू' या गाजलेल्या हॉरर चित्रपटात त्याने 'एडी कॅस्पब्रॅक' ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याच्या सहज आणि प्रभावी अभिनयामुळे त्याने जगभरातील चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले होते.
In loving memory of James Ransone. pic.twitter.com/7CKjnAnrCD
— HBO (@HBO) December 21, 2025
जेम्सच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याच्या सहकाऱ्यांनी आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता फ्रांस्वा अर्नाड याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, जेम्स हा एक असा कलाकार होता जो नेहमी इतरांना प्रेरणा देत असे. अनेक कलाकारांनी त्याला एक 'निडर आणि अष्टपैलू' अभिनेता म्हणून संबोधले आहे. जेम्सने आत्महत्या का केली, याचा पोलीस तपास करत आहेत.
वैयक्तिक जीवनातील संघर्ष
१९७९ मध्ये बाल्टीमोर येथे जन्मलेल्या जेम्सची कारकीर्द २००२ मधील 'केन पार्क' या चित्रपटापासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. मात्र, त्याचे वैयक्तिक आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेले होते. २०२१ मध्ये त्याने एका मुलाखतीत उघड केले होते की, लहानपणी त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते, ज्याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर आणि आयुष्यावर खोलवर परिणाम झाला होता. जेम्स रॅन्सोनच्या जाण्याने हॉलिवूडने एक प्रतिभावान कलाकार गमावला असल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.