अवघ्या २३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप, 'या' गंभीर आजारामुळे झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:24 IST2025-10-24T13:20:49+5:302025-10-24T13:24:36+5:30
Isabelle Tate Passes Away: मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली असून प्रसिद्ध अभिनेत्रीचं वयाच्या २३ व्या वर्षी निधन झाल्याने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे

अवघ्या २३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप, 'या' गंभीर आजारामुळे झाला मृत्यू
Isabelle Tate Death: मनोरंजन विश्वातून एका अत्यंत दुःखद बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध टीव्ही सिरीज '9-1-1: नॅशविल' (9-1-1: Nashville) मध्ये काम करणारी युवा अभिनेत्री इझाबेल टेट (Isabelle Tate) हिचं वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी निधन झालं आहे. १९ ऑक्टोबर रोजी तिने तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्रीची टॅलेंट एजन्सी मॅक्रे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या दुःखद घटनेची अधिकृत माहिती दिली आहे. इझाबेलच्या अकाली जाण्यामुळे तिच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या आजारामुळे झाला मृत्यू
इझाबेल टेटच्या मृत्यूचं कारण एका दुर्मीळ न्यूरोलॉजिकल विकाराशी (Rare Neurological Disorder) संबंधित असल्याचं सांगण्यात आलं आहे. तिला शार्कॉट-मेरी-टूथ म्हणजेच सीएमटी (Charcot-Marie-Tooth - CMT Disease) हा आजार होता. सीएमटी हा एक न्यूरोमस्कुलर आजार आहे, जो शरीरातील स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम करतो. यामुळे रुग्णाच्या शरीराच्या आतील स्नायू हळूहळू कमकुवत होतात.
इझाबेलला वयाच्या १३ व्या वर्षीच या गंभीर आजाराचं निदान झालं होतं. तिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या आरोग्याविषयी माहिती देताना सांगितलं होतं की, हळूहळू तिची प्रकृती खालावत असून भविष्यात तिला व्हीलचेअरचा वापर करावा लागू शकतो.
मॅक्रे एजन्सीने आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, "इझी (इझाबेल) नुकतीच अभिनयाच्या दुनियेत परतली होती. तिने पहिल्याच ऑडिशनमध्ये '9-1-1: नॅशविल' या लोकप्रिय सिरीजमध्ये काम मिळवलं होतं. तिला मिळालेली लोकप्रियता हा आमच्यासाठी मोठा सन्मान होता. तिची आई, बहीण, कुटुंबीय तसेच मित्रांसाठी आम्ही शोक व्यक्त करतो." इझाबेल टेटच्या रूपाने एका नवख्या आणि उत्कृष्ट अभिनेत्रीला अकाली गमावल्यामुळे मनोरंजन विश्वात शोककळा निर्माण झाली आहे.