'धुरंधर'ला मराठी सिनेमाचं दमदार 'उत्तर'! सिनेमाने २० दिवसांत केली 'इतकी' कमाई, क्षितीज पटवर्धनची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:29 IST2026-01-01T16:28:29+5:302026-01-01T16:29:55+5:30
'धुरंधर'चं आव्हान असलं तरीही 'उत्तर' या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे

'धुरंधर'ला मराठी सिनेमाचं दमदार 'उत्तर'! सिनेमाने २० दिवसांत केली 'इतकी' कमाई, क्षितीज पटवर्धनची पोस्ट चर्चेत
सध्या एक मराठी सिनेमा प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतो आहे. हा सिनेमा म्हणजे 'उत्तर'. रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांची भूमिका असलेला प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेत आहे. गीतकार-पटकथाकार क्षितीज पटवर्धनने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. समोर 'धुरंधर' सिनेमाचं तगडं आव्हान असूनही 'उत्तर' सिनेमाने चांगली कमाई केली आहे. अशातच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळाला, याविषयी क्षितीजने लिहिलं आहे.
क्षितीजने दादरमधील चित्रपटगृहामधील फोटो शेअर करत लिहिलंय की, ''तुम्ही पहिली सकाळ सुंदर केलीत!! काल रात्री आम्हाला दादरचा आजचा सकाळी 10 चा शो मिळाला, त्यात पेपरात जाहिरात नाही. फक्त ऑनलाइन. वर्षाच्या पहिल्या सकाळी लोक येतील का हा विचार आम्हाला लोकानी येऊच दिला नाही. कारण ते आले. नुसते आले नाही, भरपूर संख्येने आले.''
''चौथा आठवडा सुरू करताना चौपट उत्साह दिला आजच्या प्रेक्षकांनी! नव्या वर्षाची सुरुवात प्रेक्षकाच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने झाली! थिएटर स्टाफ सुद्धा सकाळी ही गर्दी बघून आनंदला होता!! 'उत्तरा'यण सुरू करताना आशा, उत्साह, प्रेम आणि प्रयत्न सगळं वाढतंय.'', अशाप्रकारे क्षितीज पटवर्धनने पोस्ट लिहित मराठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. सैकनिल्कच्या अहवालानुसार, 'उत्तर' सिनेमाने २० व्या दिवशीही चांगली कमाई केली असून या सिनेमाने २० दिवसांत २.२५ कोटींची कमाई केली आहे. 'उत्तर'ला मिळालेला प्रतिसाद वाढता आहे.