'हिंदी शिकत का नाही?' रिपोर्टरच्या प्रश्नावर संतापला विजय सेतुपती; म्हणाला, 'तुमचा प्रश्न चुकीचा..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 16:09 IST2024-01-08T16:07:58+5:302024-01-08T16:09:37+5:30
Vijay Sethupathi: विजय लवकरच कतरिना कैफसोबत मेरी क्रिसमस या सिनेमात झळकणार आहे.

'हिंदी शिकत का नाही?' रिपोर्टरच्या प्रश्नावर संतापला विजय सेतुपती; म्हणाला, 'तुमचा प्रश्न चुकीचा..'
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) लवकरच मेरी क्रिसमस (Merry Christmas) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच तो अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या सिनेमाची टीम जोरदार प्रमोशन करत आहे. यात अलिकडेच विजयने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. परंतु, यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे विजय चांगलाच संतापला. इतकंच नाही तर त्याला चारचौघात चांगलंच सुनावलं.
'मेरी क्रिसमस' हा सिनेमा येत्या १२ जानेवारीला रिलीज होत आहे. त्यापूर्वी विजय ७ जानेवारीला चेन्नईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. यावेळी त्याला हिंदी भाषेवरुन काही खोचक प्रश्न विचारण्यात आले. ज्यावर तो संतापला.
गेल्या ७५ वर्षांपासून तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेला विरोध केला जात आहे. आजही अनेक जण 'हिंदी थेरियाधु पोडा' (मला हिंदी भाषा येत नाही.) असं लिहिलेले टी-शर्ट घालून फिरत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हिंदी भाषा शिकली पाहिजे का? असा प्रश्न एका पत्रकाराने विजयला विचारला.
काय म्हणाला विजय?
"हिंदीला एक भाषा म्हणून आम्ही कधीच विरोध केला नाही.आणि, तुम्ही तेच आहात ना जो हाच प्रश्न तुम्ही आमिर खानलाही विचारला होता. तुम्ही एकच प्रश्न वारंवार का विचारता? आम्ही कधीच हिंदीला नाही म्हटलेलं नाही. फक्त हिंदीची सक्ती करण्याचा विरोध केलाय. या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. इथले लोकही हिंदी शिकत आहेत. आणि, कोणीही त्याच्या विरोध करत नाहीत. तुमचा प्रश्न चुकीचा आणि संबंध नसणारा आहे. कोणीही कोणाला हिंदी शिकण्यापासून अडवू शकत नाही. मंत्र्यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं आहे ते नक्की पहा", असं उत्तर विजयने दिलं.