Vidya Balan : अक्षय कुमार दिसला, बाकी कुणी दिसलं नाही का? विद्या बालन का भडकली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:40 IST2022-08-10T15:39:13+5:302022-08-10T15:40:47+5:30
Vidya Balan : आपल्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्याने बॉलिवूडमध्ये स्त्री कलाकार व पुरूष कलाकारांमध्ये होत असलेल्या भेदभावावर आपलं परखड मत मांडलं...

Vidya Balan : अक्षय कुमार दिसला, बाकी कुणी दिसलं नाही का? विद्या बालन का भडकली?
स्त्रीप्रधान चित्रपटांचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे, हे खरं. पण आजही निर्माते-दिग्दर्शक स्त्रीप्रधान बनवताना घाबरतात. अर्थात हे आमचं मत नाही तर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिचं मत आहे. आपल्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्याने बॉलिवूडमध्ये स्त्री कलाकार व पुरूष कलाकारांमध्ये होत असलेल्या भेदभावावर आपलं परखड मत मांडलं. एका कार्यक्रमात बोलताना तिने ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचंही उदाहरण दिलं.
काय म्हणाली विद्या?
कोरोना महामारीनंतर लोकांना एक बहाणा मिळाला आहे. स्त्रीकेंद्रित सिनेमे चालणार नाही, असा बहाणा पुढे केला जात आहे. पण अलीकडेच्या काळात अनेक मोठ्या हिरोचे चित्रपट देखील दणकून आपटले आहेत, अर्थात हे मान्य करायला इंडस्ट्री तयार नाही. एकापाठोपाठ एक सिनेमे आणले जातात आणि तुमचे सो-कॉल्ड हिरो फ्लॉप होतात. यासगळ्यात स्त्री केंद्रित चित्रपटांबद्दल बोलायला कुणीच तयार नाही. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया भट हिरो होती. या चित्रपटाचे पुरूष कलाकारांच्या चित्रपटांपेक्षा चांगला बिझनेस केला. पण त्याकडे कुणीच लक्ष देणार नाही, असं विद्या म्हणाली.
म्हणे, अक्षयचा सिनेमा...
सिनेमाचा स्त्रीकेंद्रीत सिनेमा म्हणून प्रचार केला तर पुरूष चाहते नाराज होतील, असं निर्माते मानतात. ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचं उदाहरण घ्या. या चित्रपटाने चांगला बिझनेस केला होता. पण अखेर या चित्रपटाला सुद्धा अक्षयचा सिनेमा म्हणून प्रमोट करण्यात आलं. हे खूपच निराशाजनक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एकटा नव्हता तर लीड रोलमध्ये पाच अभिनेत्री होत्या. पण त्यांना फक्त अक्षय दिसला. त्याच्या सोबतीला असलेल्या या पाच स्त्री कलाकार त्यांना दिसल्या नाही. सगळ्यांच्या मते, आम्ही मुख्य भूमिकेत नव्हतो. कोणीतरी माझ्याशी माझ्या शेवटच्या हिट चित्रपटाबद्दल बोलत होतं, पण त्याने ‘मिशन मंगल’चा उल्लेख केला नाही. तो तर अक्षयचा सिनेमा होता ना? असं तो म्हणाला. यावर तुम्हाला चित्रपटात मी आणि इतर महिला कलाकार दिसल्या नाहीत का? असा प्रश्न मी केला होता. बॉलिवूडमध्ये आजही नायक हाच चित्रपटातील मुख्य पात्र आहे, असं गृहित धरलं जातं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. बॉलिवूडचे निर्माते स्त्रीप्रधान चित्रपट बनवायला घाबरतात, असं विद्या म्हणाली.