देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 09:57 IST2025-12-22T09:54:16+5:302025-12-22T09:57:32+5:30
विकीने आदित्य धरच्याच 'उरी' सिनेमात काम केलं होतं. तो म्हणाला...

देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
बॉलिवूडमध्ये सध्या 'धुरंधर'ची हवा आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमाने ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. याआधी विकी कौशलच्या 'छावा'ने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. विकीने आदित्य धरच्याच 'उरी' सिनेमात काम केलं होतं. 'धुरंधर' प्रोपगंडा, नॅशनलिस्ट सिनेमा आहे अशीही अनेक जण अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया देत आहेत. या चर्चांमध्ये आता विकी कौशलने त्याचं मत मांडलं आहे. सिनेमांना नॅशनलिस्ट फॉर्म्युला समजणं हा अपमान आहे असं तो म्हणाला.
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं यावर विकी कौशलने असहमती दर्शवली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मला वाटतं देशभक्ती ही कोणता फॉर्म्युला असू शकत नाही. याला फॉर्म्युला म्हणणं हा या भावनेचा अपमान आहे. देशभक्ती हे असं सत्य आहे जे आपण सिनेमा, साहित्य आणि क्रीडाच्या माध्यमातून दाखवत राहू. हे असं माध्यम आहे ज्यातून आपण आपलं म्हणणं मांडू शकतो. देशातील विविधता, वारसा आणि सत्याचा आपल्याला अभिमान वाटतो हे आपण सांगू शकतो. मला खूप आनंद होतोय की मी या भव्यतेचा एक छोटा भाग आहे जिथे आपण न घाबरता ग्लोबल नकाशावर भारताचं प्रतिनिधित्व करु शकतो."
विकी कौशलचा 'उरी' २०१९ साली आला होता. या सिनेमाने त्याच्या करिअरला वेगळं वळण दिलं. तो बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचला. तरी त्याचे पाय जमिनीवर आहेत हे त्याच्या या प्रतिक्रियेतून जाणवतं. विकी आगामी 'लव्ह अँड वॉर'सिनेमात दिसणार आहे. संजय लीला भन्साळींच्या या सिनेमामध्ये त्याच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट आहेत. तसंच वैयक्तिक आयुष्यातही विकी खूप आनंदात आहे कारण गेल्या महिन्यातच तो बाबा झाला आहे. त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफने ७ नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिला. सध्या विकी लेकासोबत वेळ घालवत आहे.