चाहत्याने अचानक दिली छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, विकी कौशलने आधी चप्पल काढली आणि नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 09:06 IST2025-08-28T08:58:29+5:302025-08-28T09:06:22+5:30
विकी कौशलला एअरपोर्टबाहेर चाहत्याने अचानक छत्रपती शंभूराजांची मूर्ती दिली. त्यावेळी विकीने केलेल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलंय

चाहत्याने अचानक दिली छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, विकी कौशलने आधी चप्पल काढली आणि नंतर...
अभिनेता विकी कौशल 'छावा' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला. 'छावा' सिनेमात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. अशातच 'छावा'फेम विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत एका चाहत्याने विकीला अचानक छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून दिली. त्यावेळी मूर्ती स्वीकारताना विकीने केलेल्या एका कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. काय घडलं?
विकीची नम्रता आणि ‘संस्कार’
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून विकी कौशल मुंबई विमानतळावर परतला होता. त्यावेळी, एका चाहत्याने त्याला छत्रपती संभाजी महाराजांची एक छोटी मूर्ती भेट म्हणून दिली. ही अनमोल भेट मिळणं विकीला अनपेक्षित होतं. ही भेट स्वीकारण्याआधी विकीने कोणताही विचार न करता, मागे जाऊन त्याच्या पायातील चप्पल काढली. त्यानंतर त्याने आदराने ती मूर्ती हातात घेतली आणि त्या चाहत्यासोबत फोटो काढला. विकी कौशलच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर किती छान संस्कार आहेत, हे पाहायला मिळतं.
Vicky Kaushal respectfully removed his shoes before receiving Chhatrapati Sambhaji Maharaj's murti from a fan ❤️ The most humble star of this gen ⭐#VickyKaushalpic.twitter.com/uzq5eHkoHZ
— Vicky Kaushal Nation (@vickyknation) August 25, 2025
‘छावा’ चित्रपटामुळे विकीची चर्चा
विकी कौशलने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे चाहत्याने दिलेली ही भेट त्याच्यासाठी अधिक खास होती. त्याच्या या नम्र आणि आदरपूर्वक वागण्यामुळे चाहत्यांनी त्याचं खूप कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करत, ‘हेच खरे संस्कार आहेत,’ असं म्हटलं आहे. विकी कौशलने केलेल्या या कृतीतून त्याच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे आणि आदर आहे, हे दिसतं.