आईवडिलांचा घटस्फोट, सगळीकडे त्याच बातम्या; सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाने व्यक्त केलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:58 IST2025-01-29T14:57:34+5:302025-01-29T14:58:11+5:30
वीर लहान असतानाच त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता

आईवडिलांचा घटस्फोट, सगळीकडे त्याच बातम्या; सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाने व्यक्त केलं दु:ख
अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' हा हिंदी सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या सिनेमातून वीर पहाडिया (Veer Pahariya) या नवोदित अभिनेत्यानेही पदार्पण केलं आहे. वीर हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा नातू आहे. तसंच जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचा तो भाऊ आहे. वीरचं लहानपणापासूनच अभिनेता होण्याचं स्वप्न होतं जे आज पूर्ण झालं आहे. वीर लहान असतानाच त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. याचा त्याच्यावर काय परिणाम झाला याबद्दल त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत वीर पहाडिया म्हणाला, "हो. कोणत्याही लहान मुलासाठी ही वाईट गोष्ट असते जेव्हा त्याचे आई वडील विभक्त होतात. मी याविषयी कोणालाच काही बोलू शकत नव्हतो. मित्रांनाही सांगायला मला संकोच वाटायचा. ही खूपच विचित्र गोष्ट होती. प्रत्येक वर्तमानपत्रात याच्या बातम्याही होत्या. त्यामुळे मला शाळेत जातानाही खूप लाज वाटायची. तसाही माझा स्वभाव बुजराच होता. माझे जास्त मित्रही नव्हते. आता या इंडस्ट्रीत काम करायचंय म्हणून सगळ्यांच्या नजरेत राहण्यासाठी मी स्वत:ला तसं ट्रेन केलं आहे. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच कोणासाठी चांगली नसते. कोणालाही अशा परिस्थितीतून जायला लागू नये असंच मला वाटतं."
या कारणामुळे तुझाही लग्नसंस्थेवरुन विश्वास उडाला का? यावर तो म्हणाला, "मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यातल्या ट्रॉमाशी आपण लढलं पाहिजे. सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही दु:ख असतंच. यासाठी तुम्ही सतत कोणाशी ना कोणाशी बोललं पाहिजे. मला थेरपीची खूप मदत झाली. कलाकार म्हणून आधी स्वत:ला ओळखा तरंच तुम्ही दुनियादारी शिकाल हे मी अॅक्टिंग वर्कशॉपमध्ये शिकलो. त्यामुळे माझा प्रेम, लग्न यावर विश्वास आहे. लग्न करायचंच नाही असं माझं काही नाही."
"माझ्या पालकांनी आई आणि वडील ही भूमिका चोख पार पाडली. कदाचित पती-पत्नी म्हणून ते एकमेकांसोबत चांगले नव्हते. मला आणि माझ्या भावाला कधीच असं वाटलं नाही की ते दोघं आमच्यात आयुष्यात मिसिंग आहेत."