'बॉर्डर २' मधील अभिनयामुळे वरुण धवन झाला ट्रोल, सनी देओलने केली पाठराखण, म्हणाला- "सेटवर तो सतत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:17 IST2026-02-12T17:16:54+5:302026-02-12T17:17:57+5:30
'बॉर्डर २' चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच, दुसरीकडे सोशल मीडियावर वरुण धवनला त्याच्या 'ओव्हर ॲक्टिंग'साठी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं

'बॉर्डर २' मधील अभिनयामुळे वरुण धवन झाला ट्रोल, सनी देओलने केली पाठराखण, म्हणाला- "सेटवर तो सतत..."
सनी देओलच्या मुख्य भूमिकेतील 'बॉर्डर २' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून, या आयकॉनिक वॉर ड्रामाने भारतात ३०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत 'सुपरहिट'चा टॅग मिळवला आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच, दुसरीकडे सोशल मीडियावर वरुण धवनला त्याच्या 'ओव्हर ॲक्टिंग'साठी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. आता या ट्रोलिंगवर स्वतः सनी देओलने वरुणची बाजू सावरत टीकाकारांना सुनावले आहे.
वरुण धवन मेहनती मुलगा
'बॉर्डर २' च्या सक्सेस पत्रकार परिषदेत सनी देओलला वरुण धवनच्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सनी म्हणाला, "वरुण हा अत्यंत मेहनती मुलगा आहे. सेटवर मी त्याला सतत सराव करताना पाहिले आहे. तो ज्या प्रकारे फाईट सीन्स करायचा, वारंवार पडायचा आणि पुन्हा उभा राहायचा, ते पाहून मला आमच्या तरुणपणीच्या दिवसांची आठवण झाली. त्याच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली आणि मी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो."
सोशल मीडियावर वरुणला 'ओव्हर ॲक्टिंगचे दुकान' म्हणणाऱ्यांना सनीने खडे बोल सुनावले आहेत. सनी म्हणाला की, "आजकाल सोशल मीडियावर जे लोक नकारात्मक गोष्टी पसरवतात, ते त्यांच्या मनातील राग किंवा नैराश्य बाहेर काढत असतात. वरुण एक प्रामाणिक अभिनेता आहे आणि अशा नकारात्मक कमेंट्समुळे त्याच्या मेहनतीवर काहीही परिणाम होणार नाही."
'बॉर्डर २' ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड
'बॉर्डर २' मध्ये सनी देओलने फतेह सिंगची भूमिका साकारली असून संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे. वरुण धवनसोबतच सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या कामाचेही कौतुक होत आहे. काही प्रेक्षकांनी चित्रपटातील गाण्यांच्या रिमेकबद्दल नाराजी व्यक्त केली असली, तरी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अजूनही थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.
सनी देओल आणि वरुण धवन यांच्यात वयाचे अंतर असले, तरी सेटवर त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली आहे. सनीने घेतलेल्या या भूमिकेमुळे वरुणच्या चाहत्यांनी सनीचे आभार मानले आहेत.