'हम पांच' फेम अभिनेत्री आता काय करते? पतीच्या निधनानंतर इंडस्ट्रीतून झाली अचानक गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:00 IST2026-02-17T11:00:00+5:302026-02-17T11:00:00+5:30
Shoma anand: शोमा आनंद यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले. यात जागीर, कुली यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

'हम पांच' फेम अभिनेत्री आता काय करते? पतीच्या निधनानंतर इंडस्ट्रीतून झाली अचानक गायब
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'हम पांच'. अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेली ही हिंदी मालिका त्याकाळी प्रचंड गाजली. या मालिकेत अशोक सराफ यांच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका अभिनेत्री शोमा आनंद यांनी साकारली होती. शोमा आनंद यांनी मालिकांसोबतच अनेक गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. मात्र, एकेकाळी सुपरहिट सिनेमा देणारी ही अभिनेत्री सध्या काय करते हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शोमा आनंद यांचं खरं नाव नीलम अरोडा आहे. सुरुवातीच्या काळात सिनेमातील मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. मात्र, कालांतराने उत्तम खलनायिका म्हणून लोकप्रियता मिळवली. १९७६ मध्ये बारुद या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात ऋषी कपूर यांनी त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
शोमा आनंद यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले. यात जागीर, कुली यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकेकाळी लीड अॅक्ट्रेस असलेल्या या अभिनेत्रीला सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका मिळू लागल्या आणि त्यांच्या करिअरला वेगळी दिशा मिळाली. 2003 मध्ये आलेल्या 'हंगामा' या सिनेमात त्यांनी परेश रावल यांच्या पत्नीची अंजलीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका बरीच गाजली होती. या सिनेमानंतर त्या 'क्या कूल हैं हम' ,'कल हो ना हो' या सिनेमात झळकल्या. मात्र, त्यानंतर त्यांचा कलाविश्वातील वावर हळूहळू कमी झाला.
सध्या काय करतात शोमा आनंद?
शोमा आनंद यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं. मात्र, पतीच्या निधनानंतर त्यांनी अचानकपणे इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला. 2021 मध्ये त्यांच्या पतीचं दिग्दर्शक तारीक शाह यांचं निधन झालं. तारीक यांच्या निधनानंतर शोमा आनंद यांनी इंडस्ट्रीला रामराम करायचा निर्णय घेतला. त्यामुळे आता त्या त्यांच्या कुटुंबासोबत आणि लेक सारा शाहसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत.
शोमा आनंद यांचे गाजलेले सिनेमा, मालिका
'घर एक मंदिर', 'घर द्वार', 'स्वर्ग से सुंदर', 'बड़े घर की बेटी', आणि 'जैसी करनी वैसी भरनी' यांसारखे गाजलेले सिनेमा केले. सोबतच त्यांच्या 'हम पांच' , 'भाभी', 'शरारत', 'मायका', 'जिनी और जूजू', आणि 'खेलती है जिंदगी आंख मिचौली' या मालिकाही गाजल्या.