अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे बर्बाद झालं या अभिनेत्रींचं करिअर, कोणी देश सोडला, तर कुणी भोगला तुरूंगवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 19:34 IST2024-07-08T19:30:40+5:302024-07-08T19:34:52+5:30
बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री अंडरवर्ल्डच्या जाळ्यात अडकल्या. त्यामुळे त्यांचे सिने करिअर उद्ध्वस्त झाले. काही अभिनेत्रींचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी तर कुणाचे अबू सालेमसोबत जोडले गेले.

अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे बर्बाद झालं या अभिनेत्रींचं करिअर, कोणी देश सोडला, तर कुणी भोगला तुरूंगवास
एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा दबदबा होता. ८० आणि ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अंडरवर्ल्डचा हस्तक्षेप पाहायला मिळाला. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीही अंडरवर्ल्डच्या जाळ्यात अडकल्या. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचे सिने करिअर उद्ध्वस्त झाले. काही अभिनेत्रींचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी तर कुणाचे अबू सालेमसोबत जोडले गेले. जाणून घेऊयात बॉलिवूडच्या याअभिनेत्रींबद्दल.
मंदाकिनी -
मंदाकिनीने तिच्या पहिल्याच चित्रपटातून लोकांची मने जिंकली होती. 'राम तेरी गंगा मैली'मधून डेब्यू करणाऱ्या मंदाकिनीच्या सौंदर्याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही आकर्षित केले होते. या दोघांनी स्टेडियममधून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहत असल्याचे फोटोही समोर आले होते. यानंतर मंदाकिनीला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले. ती एकेकाळी अव्वल अभिनेत्री बनण्याच्या शर्यतीत होती. पण तिने स्वत:च्या हातून करिअर बर्बाद केले होते.
ममता कुलकर्णी
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये ममता कुलकर्णीची गणना होते. ममता कुलकर्णी केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत होती. मात्र ड्रग डीलर विकी गोस्वामीसोबत तिचे नाव जोडले गेल्यानंतर तिच्या करिअरचा आलेख खाली घसरायला लागला. दोघांनी लग्नही केल्याचे बोलले जाते. पण ममता कुलकर्णीने हे कधीच मान्य केले नाही. कालांतराने ममताही भारत सोडून गेली. पुढे ती संन्यासी बनून आयुष्य जगू लागली.
मोनिका बेदी
४९ वर्षीय मोनिका बेदी एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. मोनिका बेदीचीही अंडरवर्ल्डशी जवळीक होती. तिचे नाव डॉन अबू सालेमशी जोडले गेले होते. त्यामुळे तिची अभिनय कारकीर्द उद्ध्वस्त झाली. त्यानंतर अबू सालेमला पोलिसांनी अटक केली. बनावट पासपोर्ट प्रकरणात मोनिका नंतर तुरुंगात गेली.
जॅस्मिन धुना
जॅस्मिन धुनाने आपल्या अप्रतिम सौंदर्याने सर्वांना वेड लावले होते. तिने 'वेराना' चित्रपटात काम केले. या हॉरर चित्रपटातून तिला विशेष ओळख मिळाली. तिचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडले गेल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. पुढे जॅस्मिन बॉलिवूडमधून गायब झाली. जॅस्मिनबद्दल आता कोणतीही माहिती उपलब्ध नाही. काही जण म्हणतात की ती मुंबईत आहे तर काही म्हणतात की ती आता या जगात नाही.
अनिता आयुब
अनिता अयुबवर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप होता. पाकिस्तानी अभिनेत्री अनिता अयुबनेही बॉलिवूडमध्ये काम केले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. याचा तिच्या चित्रपट कारकिर्दीवर खोलवर परिणाम झाला होता.