"बॉर्डर २', 'रामायण' अन् 'लाहोर १९४७' कधी प्रदर्शित होणार? सनी देओलनं दिलं अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:18 IST2025-03-26T16:18:04+5:302025-03-26T16:18:24+5:30
'जाट' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी सनी देओल आगामी चित्रपटांबद्दल अपडेट दिलं आहे.

"बॉर्डर २', 'रामायण' अन् 'लाहोर १९४७' कधी प्रदर्शित होणार? सनी देओलनं दिलं अपडेट
Sunny Deol: बॉलिवूड अभिनेता सनी देओलने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. 'गदर २'नंतर सनी देओलच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. सनी देओल एकापेक्षा एक धमाकेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापैकी एक म्हणजे 'जाट'. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहते सिनेमा पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सनीनं आपल्या आगामी बीग बजेट चित्रपटांबद्दलही अपडेट दिलं आहे.
'जाट'च्या ट्रेलर लाँचच्या वेळी सनी देओल आगामी चित्रपटांबद्दल म्हणाला, "गदर २ ने माझ्यासाठी सर्व दरवाजे उघडले आहेत. माझा नेहमीच मोठे चित्रपट करण्याचा विचार होता. आता हे घडत आहे. 'लाहोर १९४७' या वर्षी प्रदर्शित होईल. इतर जे दोन प्रोजेक्ट आहेत, त्याबद्दल मी आताच काहीही सांगू शकत नाही. पण वेळ आल्यावर मी नक्कीच याबद्दल बोलेन", असं तो म्हणाला.
फक्त 'जाट' नाही तर सनीचे 'बॉर्डर २', 'लाहोर १९४७' आणि 'रामायण' हे चित्रपट येणार आहेत. सनी देओलच्या 'बॉर्डर २'चं शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे अनुराग सिंग करत आहेत. या चित्रपटात सनीसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टीसारखे कलाकार दिसणार आहेत. यासोबतच सनी देओल राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर १९४७' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करतोय. 'लाहोर १९४७'चं चित्रीकरण पूर्ण झाले आहे. याशिवाय, सनी हा नितेश तिवारी यांच्या बिग बजेट चित्रपट 'रामायण'मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 'रामायण' मध्ये हनुमानाची भूमिका साकारणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.
सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, हा त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा अॅक्शन चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. 'जाट' सिनेमात 'रणदीप हुडाने रणतुंगा या खलनायकाच्या रुपात खऱ्या अर्थाने मैफिल लुटली आहे. तर 'छावा' मध्ये 'कवी कलश' यांची भूमिका गाजवणारा विनीत कुमार सिंगही खलनायकाच्या भूमिकेत दिसतोय. तर अभिनेत्री सैय्यामी खेर सिनेमात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतेय. हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.