Sunny Deol : "तुमच्या घरी आई-वडील आहेत, लाज नाही वाटत?"; सनी देओलचा पारा चढला; पापाराझींना ओरडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:23 IST2025-11-13T11:22:32+5:302025-11-13T11:23:17+5:30
Sunny Deol Angry at Paparazzi : धर्मेंद्र यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना सनी देओलच्या रागाचा सामना करावा लागला. काय घडलं नेमकं?

Sunny Deol : "तुमच्या घरी आई-वडील आहेत, लाज नाही वाटत?"; सनी देओलचा पारा चढला; पापाराझींना ओरडला
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर असतानाच त्यांना रुग्णालयातून काल घरी सोडण्यात आलं. धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार घरीच करण्याचा निर्णय देओल कुटुंबाने घेतला. या काळात धर्मेंद्र यांच्या घराबाहेर उभं राहून पापाराझी फोटो आणि व्हिडीओ काढत आहेत. त्यामुळे धर्मेंद्र यांचा लेक सनी देओलचा पारा चांगलाच चढला असून त्याने पापाराझींना स्पष्ट शब्दात सुनावलं.
सनी देओलचा राग अनावर, काय म्हणाला?
सोशल मीडियावर सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सनी प्रचंड रागात रस्त्यावर येतो. त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्डही असतात. सनी देओल समोर उभ्या असलेल्या मीडिया आणि पापाराझींना पाहताच त्याचा संताप अनावर होते. तो म्हणतो की, ''तुमच्या घरी आई - वडील आहेत. मुलं आहे. तरीही *** सारखं व्हिडीओ पाठवत आहात. लाज नाही वाटत''. पुढे सनी देओल मागे वळतो आणि त्याच्या सुरक्षारक्षकांना कडक शब्दात निर्देश देतो. सनी देओलला रागात पाहताच समोर उभे असलेले पापाराझीही मागे हटतात.
धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी?
धर्मेंद्र यांना बुधवारी(१२ नोव्हेंबर) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सकाळी बॉबी देओल आणि सनी देओल त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेव्हा धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला. "धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना घरी नेऊन त्यांच्यावर आता पुढील उपचार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे", असं डॉक्टर प्रतित सामदानी यांनी पीटीआयला सांगितलं. धर्मेंद्र लवकरात लवकर बरे व्हावेत, म्हणून त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.