१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घाला; सोनू सूदची सरकारकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:06 IST2025-12-12T15:05:26+5:302025-12-12T15:06:03+5:30
सध्या लहान मुलांमध्ये सोशल मीडिया आणि मोबाईलचे वाढते व्यसन ही मोठी समस्या बनत चालली आहे.

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घाला; सोनू सूदची सरकारकडे मोठी मागणी
अभिनेता सोनू सूद याने आता देशातील मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि कठोर मागणी केली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशांप्रमाणेच भारतातही १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करावा, असे आवाहन त्याने केंद्र सरकारला केले आहे.
सोनू सूदनेसोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये सोनू सूदने सध्याच्या पिढीच्या बालपणावर चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, "ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर आधीच बंदी घातली आहे आणि आता भारतानेही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने बालपण, मजबूत कौटुंबिक नातेसंबंध आणि स्क्रीनच्या व्यसनापासून मुक्ती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे".
सोनू सूदने सरकारच्या आतापर्यंतच्या कामाचे कौतुक करताना म्हटले की, "आपल्या सरकारने देशाच्या भविष्यासाठी खूप मोठे आणि उल्लेखनीय पाऊल उचलले आहेत. सोशल मीडियावरील बंदी हा देखील एक आणखी शक्तिशाली आदर्श निर्माण करणारा निर्णय ठरू शकतो". पोस्टच्या शेवटी, त्याने लिहलं, "चांगल्या उद्यासाठी आजच आपल्या मुलांचे संरक्षण करूया"
सध्या देशात लहान मुलांमध्ये सोशल मीडिया आणि मोबाईलचे वाढते व्यसन ही मोठी समस्या बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, सोनू सूदच्या या मागणीला नागरिकांकडून आणि पालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Countries like Australia have already banned social media for kids under 16 — and it’s time India considers the same. Our children deserve real childhoods, stronger family bonds, and freedom from screen addiction. 🇮🇳
— sonu sood (@SonuSood) December 11, 2025
Our Govt has taken incredible steps for the nation’s future,…
ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल
ऑस्ट्रेलियात १० डिसेंबरपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवरील १६ वर्षांखालील किशोरवयीन मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट काढून टाकण्यात आले आहे. देशातील १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने टेक कंपन्यांना अशी खाती काढून टाकण्याचा किंवा तसे न केल्याबद्दल दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने दोन किशोरवयीन मुलांच्या मृत्यूनंतर हे मोठे पाऊल उचलले आहे.