"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:31 IST2025-11-11T13:30:32+5:302025-11-11T13:31:37+5:30
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या बाहेर येताच त्यांचे घनिष्ट मित्र शत्रुघ्न सिन्हांनी संताप व्यक्त करुन धर्मेंद्र यांच्याविषयी प्रेम दर्शवलं आहे

"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या कालपासून सुरु आहेत. ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. याच दरम्यान, काही रिपोर्ट्समध्ये धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या, ज्यामुळे धर्मेंद्र यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा चांगलेच संतापले. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, विश्वसनीय मीडियाच्या या बातम्या पाहून त्यांनाही सुरुवातीला वाटलं की निधनाची बातमी खरी असावी, पण नंतर त्यांना खरं काय ते समजलं.
शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
बॉलिवूड हंगामाशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “मी सकाळी उठलो आणि मला या रिपोर्ट्सबद्दल समजले. विश्वसनीय मीडियाकडून हे सांगितलं जात असल्याने, मला वाटलं की, ही बातमी खरी असेल. पण नंतर मला कळालं आणि मी आश्चर्यचकित झालो. त्याचवेळी या बातम्या खोट्या ठरल्याने मला दिलासाही मिळाला. सर्वांचे लाडके धरम जी ठीक आहेत आणि लवकरच ते घरी परत येतील.”, अशी प्रतिक्रिया देत 'मरे उनके दुश्मन', असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
शत्रुघ्न सिन्हा यांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “धरम जी यांच्याकडे कोणतीही टीम नाही. मग कोणत्या टीमने त्यांच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली आहे? हे सगळे पूर्णपणं चुकीचे आहे.”
शत्रुघ्न सिन्हा आणि धर्मेंद्र हे पाच दशकांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शत्रुघ्न म्हणाले, “धर्मेंद्र आणि हेमा मालिनी माझ्या जवळचे आहेत. आम्ही तिघांनी मिळून आमच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट एकत्र केला होता, तो म्हणजे गुलाल गुहा यांचा 'दोस्त'. आमची भेट सध्या इतकी होत नाही, पण जेव्हाही आम्ही भेटतो, तेव्हा त्या संध्याकाळी आम्ही खूप गप्पा मारतो, जेवण करतो आणि संगीत ऐकतो.''
शत्रुघ्न सिन्हा शेवटी म्हणाले, “मी प्रार्थना करतो की माझ्या मित्राला आणखी अनेक वर्षे निरोगी आयुष्य लाभावे. त्यांच्याकडे अभिमान वाटावे असे खूप काही आहे. आता त्यांचे नातूही अभिनेते बनले आहेत. आमच्या चित्रपटसृष्टीत देओल कुटुंबाच्या तीन पिढ्या आल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे.”