शाहरुख खान बॉडीगार्डला किती पगार देतो? समोर आला आकडा, महिन्याला १० लाख नाही तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 11:29 IST2026-04-16T11:21:36+5:302026-04-16T11:29:57+5:30
सेलिब्रिटींच्या बॉडीगार्ड्सना वर्षाला करोडो रुपये पगार मिळतो, अशा चर्चा सोशल मीडियावर अनेकदा रंगतात.

शाहरुख खान बॉडीगार्डला किती पगार देतो? समोर आला आकडा, महिन्याला १० लाख नाही तर
ShahRukh Khan Bodyguard Salary : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान जिथे जातो, तिथे चाहत्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे बॉडीगार्ड चर्चेत येतात. सेलिब्रिटींच्या बॉडीगार्ड्सना वर्षाला करोडो रुपये पगार मिळतो, अशा चर्चा सोशल मीडियावर अनेकदा रंगतात. मात्र, शाहरुखचा बॉडीगार्ड यासीन खान याने आता या अफवांना पूर्णविराम दिलाय. त्यानं बॉडीगार्डला मिळणाऱ्या खऱ्या पगाराचा आकडा उघड केला.
यासीन खानने जवळपास १० वर्षे शाहरुख खानसाठी अंगरक्षक म्हणून काम केले आहे. "शाहरुखचा बॉडीगार्ड वर्षाला २ ते २.५ कोटी रुपये कमावतो", अशा बातम्यांवर बोलताना यासीनने स्पष्ट केले की, हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "असं काहीही होत नाही. कोणालाही वर्षाला अडीच कोटी किंवा महिन्याला १० लाख रुपये पगार मिळत नाही".
यासीनने सांगितले की, कोणत्याही अंगरक्षकाचा पगार निश्चित असतो आणि तो त्यांच्या अनुभवावर अवलंबून असतो. "जास्त अनुभव असलेल्या अंगरक्षकाला साधारणपणे महिन्याला १ लाख रुपये मिळतात. त्यामुळे करोडोंच्या पगाराच्या चर्चा केवळ अफवा आहेत", असे त्याने स्पष्ट केले.
गौरी खान देत असे अतिरिक्त मानधन
यासीनने शाहरुखसोबत काम करतानाचा एक किस्साही सांगितला. चित्रपटाच्या सेटवर जेव्हा बॉडीगार्डला जास्त काम करावे लागते, तेव्हा त्या मेहनतीचे अतिरिक्त पैसे मिळावेत अशी विनंती त्याने गौरी खानकडे केली होती. गौरी खानने त्याचे म्हणणे मान्य केले आणि सेटवर शाहरुखच्या संरक्षणासाठी त्याला अतिरिक्त मानधन देण्यास सुरुवात केली होती.