जहीरबद्दल सांगितल्यावर काय होती वडिलांची रिॲक्शन, सागरिकाने पहिल्यांदाच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:56 IST2025-02-15T15:55:22+5:302025-02-15T15:56:41+5:30

सागरिका आणि जहीर खानच्या आंतरधर्मीय विवाहाची खूप चर्चा झाली होती. यावर ती म्हणाली...

sagarika ghatge reveals how was her parents reacted when she told about dating zaheer khan | जहीरबद्दल सांगितल्यावर काय होती वडिलांची रिॲक्शन, सागरिकाने पहिल्यांदाच केला खुलासा

जहीरबद्दल सांगितल्यावर काय होती वडिलांची रिॲक्शन, सागरिकाने पहिल्यांदाच केला खुलासा

सागरिका घाटगे (Sagarika Ghatge) अभिनेत्री म्हणून सगळ्यांनाच माहित आहे. ती प्रसिद्ध क्रिकेटर जहीर खानची (Zaheer Khan) पत्नीही आहे. सागरिका मराठी कुटुंबात जन्माला आली. कोल्हापूरमध्ये तिचा जन्म झाला. 'चक दे इंडिया' सिनेमामुळे तिला ओळख मिळाली. नंतर तिने 'प्रेमाची गोष्ट' या मराठी सिनेमातही काम केलं. २०१७ मध्ये सागरिकाने जहीर खानसोबत लग्न केलं. आंतरधर्मीय विवाह केल्याने याची खूप चर्चा झाली होती. आता नुकतंच सागरिकाने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पालकांची काय होती प्रतिक्रिया?

सागरिकाने नुकतीच'हॉटरफ्लाय'ला मुलाखत दिली. यावेळी तिने आंतरधर्मीय विवाह, पालकांची प्रतिक्रिया यावर पहिल्यांदाच भाष्य केलं. ती म्हणाली, "आमचं आंतरधर्मीय लग्न झालं यावर इतरांनीच जास्त चर्चा केली. माझे पालक खूप पुढारलेल्या विचारांचे आहेत. मुलगा कोण, कसा आहे हे त्यांनी नक्कीच बघितलं. कारण मी चांगल्या मुलाशी लग्न करणं महत्वाचं होतं. मी जहीरला डेट करतेय हे मला वडिलांना सांगावं लागलं कारण आम्ही दोघंही युवराज सिंगच्या लग्नाला एकत्र जाणार होतो. तिथे चर्चा होणारच होती त्यामुळे मी त्याआधीच वडिलांना सांगितलं. मग जहीर आणि ते भेटले. त्यांच्यात मस्त गप्पा झाल्या. पण मला नंतर कळलं की माझ्या वडिलांना आमच्या दोघांबद्दल समजलं होतं तेव्हा त्यांनी जहीरचे कोच अंशुमन गायकवाड यांना मेसेज केला होता. ते आमचे नातेवाईकच आहेत. मग त्यांनी जहीरला मेसेज केला की तू माझ्या भाचीसोबत रिलेशनमध्ये आहेस का? जहीरने मला तो दाखवला आणि आम्ही हसलो."

ती पुढे म्हणाली, "माझ्या वडिलांनी त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं. तो खूप चांगला क्रिकेटर असल्याचीच सर्वांनी प्रतिक्रिया  दिली होती. पण तरी माझ्या वडिलांना हे चेक करणं गरजेचं वाटलं होतं."

प्रसिद्ध व्यक्तीशी कधीच लग्न करायचं नव्हतं

या मुलाखतीत सागरिका खुलासा करत म्हणाली की, "मला कधीच क्रिकेटर किंवा अभिनेत्यासोबत लग्न करायचं नव्हतं. मी कोल्हापूरची आहे आणि मुंबईत मोठी झाले. माझे मित्रमंडळीही फिल्मइंडस्ट्रीतले नव्हते. मी माझ्या स्पेसमध्ये कंफर्टेंबल होते. मला कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीशी लग्न करायचं नव्हतं. ओळखीच्या माणसाशीच लग्न करायचं होतं. पण जहीर आणि माझं जुळणं हे नशिबातच होतं."
 

Web Title: sagarika ghatge reveals how was her parents reacted when she told about dating zaheer khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.