'फुले' चित्रपट टॅक्स फ्री करा; जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:21 IST2025-05-02T11:19:53+5:302025-05-02T11:21:00+5:30
जयंत पाटील यांनी पत्रात आणखी काय लिहिलं वाचा.

'फुले' चित्रपट टॅक्स फ्री करा; जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; म्हणाले...
महात्मा ज्योतिराव फुले आणि पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' (Phule) सिनेमा नुकताच रिलीज झाला. सुरुवातीला हा सिनेमा ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित होणार होता. मात्र काही संघटकांनी सिनेमातील काही दृश्यांना विरोध केल्यानंतर सिनेमाची डेट पुढे ढकलण्यात आली. २५ एप्रिल रोजी सिनेमा रिलीज झाला. आता हा सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मागणी शरद पवार गटाचे एनसीपी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली आहे.
अनंत महादेवन दिग्दर्शित 'फुले' सिनेमात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. त्यांनी समाजसुधारणाचं महत्नाचं काम केलं. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची सुरुवात केली. अशा महान दाम्पत्यावरील सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा अशी मागणी नेते जयंत पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले, "25 एप्रिल 2025 रोजी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा 'फुले" हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला असून प्रेक्षकांची मोठी पसंती या चित्रपटाला मिळत आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांना पहायला मिळावा म्हणून टॅक्स फ्री करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.
महोदय, दलितांना पाण्याचा हौद खुला केला, शिक्षणासाठी दारे उघडे केली, स्त्री शिक्षणासाठी पाऊल टाकले इतकाच मर्यादित महात्मा फुले आणि सावित्रीमाईचा इतिहास नाही. तर त्याहूनही व्यापक काम महात्मा फुले आणि सावित्रीमाईनी करून ठेवले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका अफाट आहे की जसा 19 व्या शतकात त्यांच्या कार्याला विरोध केला गेला, तितकाच विरोध 21 व्या शतकात त्यांच्या चित्रपटाला झाला. परिणामी चित्रपटातील जवळपास 12 सीन्स सेन्सॉर बोडोंने कापले. परंतु महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईचे विचार तोकडे पडले नाहीत.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी लढणाऱ्या जोडप्याचा हा संघर्ष प्रवास प्रत्येकाने पाहायला हवा. त्यांच्याविषयी अपप्रचार करणा-या जबाबदार व्यक्तींना सुद्धा हा चित्रपट आवर्जून दाखवावा, त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील, या चित्रपटातून आपल्याला समाज उन्नतीसाठी उभारलेल्या चळवळीचा जिवंत इतिहास पहायला मिळेल. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की "फूले" चित्रपट टॅक्स फ्री करत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिवर्तनवादी, पुरोगामी महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटला पाहिजे."