"इंग्रजी येत नाही हिंदीत बोल" नाना पाटेकरांचा 'हाऊसफुल ५'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:28 IST2025-05-27T17:28:18+5:302025-05-27T17:28:31+5:30
नाना पाटेकर हे आपल्या बिनधास्त आणि स्पष्ट बोलण्यासाठी चर्चेत आले आहेत.

"इंग्रजी येत नाही हिंदीत बोल" नाना पाटेकरांचा 'हाऊसफुल ५'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील Video व्हायरल
मनोरंजन विश्वात नाना पाटेकर (nana patekar) हे सर्वांचे आवडते अभिनेते. दमदार अभिनय आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना पाटेकर यांचा फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या. ज्यात नायक, खलनायक अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. आजही चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. नाना फक्त त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, परखड वक्तव्यांमुळे लक्ष वेधून घेत असतात. आताही 'हाऊसफुल ५'च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये नाना पाटेकर हे आपल्या बिनधास्त आणि स्पष्ट बोलण्यासाठी चर्चेत आले आहेत.
नाना पाटेकर हे 'हाऊसफुल ५' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आज या सिनेमाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नाना पाटेकरही सहभागी झालेत. यावेळी एका पत्रकाराने इंग्रजीत प्रश्न विचारला असता, नानांनी त्याला थेट उत्तर दिलं की, "इंग्रजी येत नाही, हिंदीमध्ये विचार". नानांचा हा अंदाज पाहून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि काही क्षणांतच त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या प्रसंगावरून पुन्हा एकदा नानांचा स्पष्टपणा लोकांना भावलेला दिसतोय. व्हायरल व्हिडीओवर काहींनी कमेंट करत लिहलं की, "नाना म्हणजे रिअल मॅन!" तर काहींनी म्हटलं, "आजच्या ग्लॅमर जगात असा थेट बोलणारा अभिनेता दुर्मीळ".
'हाऊसफुल ५' या चित्रपटात नाना पाटेकर एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये पाहायला मिळालेल्या त्याच्या पात्राला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या ६ जून रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे बजेट ३७५ कोटी रुपये आहे. त्यामुळे आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.