"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:40 IST2025-11-13T13:39:58+5:302025-11-13T13:40:45+5:30
देओल कुटुंबाला एकटं सोडा...करण जोहरने केली विनंती

"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात होते. त्यांचं निधन झाल्याच्या अफवा पसरल्या. मात्र कुटुंबियांनी हे वृ्त्त फेटाळून लावलं. काल धर्मेंद्र यांना घरीही आणण्यात आलं आणि आता घरीच त्यांच्यावर उपचार होणार आहेत. मात्र या सगळ्या प्रकारात माध्यमं, पापाराझी, सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने या संदर्भात पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
करण जोहरने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "जेव्हा हृदयातील आणि कृतीतील किमान संवेदना आणि सभ्यता नाहीशा होतात तेव्हा आपण माणूस म्हणून संपलो असं समजायचं. कृपया कुटुंबाला एकटं सोडा. ते आधीच मानसिक त्रासाचा सामना करत आहेत. आपल्या सिनेइंडस्ट्रीत मोलाचं योगदान देणाऱ्या एका दिग्गज अभिनेत्याचा पापाराझी आणि मीडियाने तमाशा बनवला आहे. हे कवरेज नाही तर हा अपमान आहे."

काही वेळापूर्वीच सनी देओलचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला. घराबाहेरील पापाराझींना पाहून तो रागात हात जोडून म्हणाला, 'तु्म्हाला लाज वाटत नाही? तुमच्या घरी आई वडील नाहीत का?'
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबतीत डॉक्टरांनीही अपडेट दिले. त्यांच्यावर पुढील उपचार घरीच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे म्हणून चाहतेही प्रार्थना करत आहेत.