१४ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पोटगी घेतली नव्हती, भावुक कारण सांगत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 17:02 IST2026-04-10T17:00:49+5:302026-04-10T17:02:30+5:30
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खास खुलासा केला आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने एका कारणाने पोटगी केली नव्हती असं ती म्हणाली. काय होतं यामागचं कारण?

१४ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पोटगी घेतली नव्हती, भावुक कारण सांगत म्हणाली...
'कल हो ना हो' फेम अभिनेत्री डेलनाज इराणीने (Delnaaz Irani) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खास खुलासा केला आहे. अभिनेता राजीव पॉल याच्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर डेलनाजने कोणतीही पोटगी (Alimony) घेण्यास नकार दिला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यामागचे भावनिक कारण स्पष्ट केले आहे.
शांततेसाठी सोडला हक्क
डेलनाज आणि राजीव यांचे १४ वर्षांचे लग्न २०१२ मध्ये अधिकृतपणे मोडले. या घटस्फोटावेळी डेलनाजने पोटगी म्हणून कोणतीही रक्कम किंवा मालमत्ता स्वीकारली नाही. डेलनाजने सांगितले की, "मला काहीही मिळाले नाही. खरं तर जे माझं होतं, ते देखील मी सोडून दिलं. मला कशाचीही ओढ नव्हती, कारण माझ्यासाठी पैशांपेक्षा मनाची शांतता जास्त महत्त्वाची होती." एकूणच डेलनाज त्यावेळी एका अशा टप्प्यावर पोहोचली होती जिथे तिला फक्त त्या नात्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा स्वतःचे आयुष्य नव्याने जगायचे होते.
घटस्फोटाचा कठीण काळ
मध्यमवर्गीय पारशी कुटुंबातून आलेल्या डेलनाजसाठी घटस्फोट घेणं हा धक्का होता. तिने नमूद केले की, त्यांच्या कुटुंबात नाती पिढ्यानपिढ्या टिकतात, त्यामुळे अशा कुटुंबात घटस्फोट घेणे हा तिच्यासाठी मोठा मानसिक धक्का होता. २०१० मध्येच ते दोघे वेगळे झाले होते, पण अधिकृत घटस्फोट होण्यासाठी दोन वर्षे लागली. या कठीण काळात तिने स्वतःला सावरले आणि पुन्हा एकदा आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले.
राजीव पॉलपासून विभक्त झाल्यानंतर डेलनाज आता पर्सी कारकरिया सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिने आपला भूतकाळ आता मागे सोडला आहे. 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही तिने आपल्या संयमी स्वभावाची झलक दाखवली होती. डेलनाजच्या पोटगी न घेण्याच्या या निर्णयाचे तिच्या चाहत्यांकडून कौतुक होत आहे.