नारायण मूर्तीं आणि सुधा मूर्ती यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:06 IST2025-03-11T12:05:56+5:302025-03-11T12:06:16+5:30
हा चित्रपट ३ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल.

नारायण मूर्तीं आणि सुधा मूर्ती यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?
Narayana Murthy Sudha Murthy: बॉलिवूडमध्ये बायोपिकचा चालू असलेला सध्याचा ट्रेंड लोकप्रिय होताना दिसत आहे. बायोपिक हा हमखास यश मिळविण्याचा फॉर्म्युला आहे. खेळाडू, कलाकार ते अगदी राजकारण्यांचा जीवन प्रवास आजवर विविध चरित्रपटांद्वारे उलगडण्यात आला आहे. आता यामध्ये भर पडणार आहे देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (Narayana Murthy) आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murty) यांची. या आदर्श जोडीचे जीवन आता रुपेरी पडद्यावर आणले जाणार आहे. लेखक-दिग्दर्शक-निर्माता जोडी अश्विनी अय्यर-तिवारी आणि नितेश तिवारी काम करत आहेत.
नुकतंच न्यूज १८शी बोलताना अश्विनी अय्यर-तिवारी यांनी चित्रपटाला होत असलेल्या विलंबावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "कथेवर काम सुरू आहे. यासाठी वेळ नक्कीच लागत आहे. पण त्यांची कहाणी लोकांसमोर आणताना मला खूप आनंद होतोय. प्रेक्षक स्वतःला त्यांच्याशी जोडू शकतील असा चित्रपट बनवणार आहोत. केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट बनवणं आमचं उद्दिष्ट नाही". हा चित्रपट नारायण मूर्ती यांच्या मातृभाषेत म्हणजेच कन्नडमध्ये बनवला जाणार आहे. कन्नडसोबत तो हिंदी, तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल.
नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्यावरील चित्रपटासाठी अद्याप कोणतेही नाव निश्चित झालेले नाही. सध्या या प्रकल्पाचं 'मूर्ती' असं नाव आहे. तसेच नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या भुमिका कोण साकारणार, हेही ठरलेलं नाही. एकदा पटकथा पुर्ण झाली की कलाकारांची नावे अंतिम केली जाणार आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी मूर्ती कुटुंबातील प्रत्येक लहान-मोठी माहिती गोळा करण्यात येत आहेत.
नारायण मूर्तींचा साधेपणा, इन्फोसिसची गरुडभरारी आणि कंपनी स्थापन करण्यासाठी १० हजार रूपये देणाऱ्या आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सुधा मूर्ती यांचा प्रवास देखील तितकाच रोमांचक आहे. सुधा मूर्ती यांचे सामाजिक कार्य, सामाजिक बांधीलकी आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रातील योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. आतापर्यंत नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे अनेक किस्से ऐकायला किंवा वाचायला मिळतात. मात्र, या दोघांचे आयुष्य चित्रपटाच्या रूपातून मोठ्या पडद्यावर पाहणे नक्कीच चांगली पर्वणी असणार आहे.