अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा दमदार अभिनय, भारतीय सैन्याची जोशपूर्ण कहाणी असलेल्या 'इक्कीस'चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:00 IST2025-10-29T17:55:55+5:302025-10-29T18:00:03+5:30
'इक्कीस' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बिग बींचा नातू सिनेमात प्रमुख भूमिकेत असून धर्मेंद्र यांचीही खास भूमिका आहे

अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा दमदार अभिनय, भारतीय सैन्याची जोशपूर्ण कहाणी असलेल्या 'इक्कीस'चा ट्रेलर रिलीज
गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चर्चा होती. हा सिनेमा म्हणजे 'इक्कीस'. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या सिनेमात झळकणार असल्याने सर्वांना उत्सुकता होती. काहीच दिवसांपूर्वी सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. अशातच नुकतंच 'इक्कीस' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतीय सैन्याच्या पराक्रमाची खास कहाणी सिनेमातून बघायला मिळणार आहे.
'इक्कीस'च्या ट्रेलरमध्ये काय?
ट्रेलरच्या सुरुवातीलाच भारतीय सैन्यातील एक जवान वचन निभावताना दिसतो. पुढच्या वर्षी आपल्या रेजिमेंटसाठी परमवीर चक्र मी घेऊन येईल, असं तो म्हणताना दिसतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये अंगावर काटा आणणारे अनेक प्रसंग बघायला मिळतात. अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत दिसत असून तो परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारताना दिसतोय. ट्रेलरमध्ये मेजर अरुण यांची छोटीसी प्रेमकहाणीही बघायला मिळतेय. याशिवाय जेव्हा सीमेवरुन अरुण यांना बोलावणं येतं तेव्हा त्यांच्या मनात असलेलं कुतुहल आणि जबाबदारी अशा दोन्ही गोष्टी बघायला मिळतात.
ट्रेलरच्या शेवटी मेजर अरुण वाढदिवसाचा केक कापताना दिसतात. त्याचवेळी ते वरिष्ठ अधिकाऱ्याला ''युद्ध होणार आहे का?'' असं विचारताना दिसतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि 'बदलापूर', 'अंधाधून' यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत जयदीप अहलावत, धर्मेंद्र या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याचवर्षी डिसेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.