हुमा कुरेशीच्या बॉयफ्रेंडने 'थामा' सिनेमात साकारली खास भूमिका; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:33 IST2025-10-24T12:16:03+5:302025-10-24T12:33:32+5:30
'थामा' सिनेमात हुमा कुरेशीचा बॉयफ्रेंड झळकला आहे. अनेकांनी त्याला ओळखलं नाही. आता हुमानेच त्याच्याविषयी खुलासा केलाय

हुमा कुरेशीच्या बॉयफ्रेंडने 'थामा' सिनेमात साकारली खास भूमिका; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली-
अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच हुमा आणि तिचा बॉयफ्रेंड रचित सिंह यांचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली होती. हुमाचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा रचित सिंह सुद्धा अभिनेता असून त्याने नुकत्याच रिलीज झालेल्या मॅडॉक फिल्म्सच्या मेगा-बजेट चित्रपट 'थामा' (Thama) मध्ये अभिनय केला आहे.
हुमा कुरेशीला रचितची 'थामा'मधील भूमिका आवडली असून तिने होणाऱ्या नवऱ्याच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'तुझ्या प्रवासाचा अभिमान आहे!', अशी पोस्ट हुमाने लिहिली आहे. रचित सिंहच्या 'थामा' चित्रपटातील एका स्क्रीनशॉटसह हुमाने एक लांबलचक नोट लिहिली, ज्यात तिने बॉयफ्रेंडच्या कष्टाचं आणि संघर्षाचं कौतुक केलं आहे.
हुमा कुरेशीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "बनारसचा एक मुलगा, जो कोणाच्याही ओळखीशिवाय आणि पाठिंब्याशिवाय मुंबईत आला... मला तुझ्यावर आणि तुझ्या या प्रवासावर खूप अभिमान आहे. मागील १० वर्षांपासून तू ॲक्टिंग कोच म्हणून खूप मेहनत घेतली. स्वतः शिकलास, इतरांना शिकवलंस आणि आज तू 'थामा' या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एकामध्ये मोठ्या पडद्यावर दिसत आहेस. हे तुझ्या मेहनतीचं आणि जिद्दीचं यश आहे... ही फक्त सुरुवात आहे. तुला अजून खूप काही मिळवायचं आहे. नेहमी यशाच्या शिखरावर राहा!"

कोण आहे रचित सिंह?
रचित सिंह हा अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एक यशस्वी अभिनय प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने आलिया भट, रणवीर सिंग आणि विकी कौशल यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांना प्रशिक्षण दिलं आहे. 'थामा' हा त्याचा मोठा बॉलिवूड प्रोजेक्ट असला तरी, त्याने यापूर्वी रवीना टंडनसोबत 'कर्मा कॉलिंग' या सिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 'थामा' या हॉरर-कॉमेडी चित्रपटात रचितने एक खलनायकी भूमिका साकारली आहे, ज्याचं कौतुक केलं जात आहे.
'थामा' हा चित्रपट आयुषमान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिकांनी सजलेला आहे. हुमाने बॉयफ्रेंडचं कौतुक केलं असल्याने दोघांच्या लग्नाची अटकळ बांधली जात आहे.