प्रसिद्ध गायक अदनान सामीविरोधात १७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:09 IST2025-10-28T11:07:07+5:302025-10-28T11:09:37+5:30
पाकिस्तानातून भारतीय नागरिकत्व स्वीकारलेला गायक अदनान सामीविरोधात तब्बल १७ लाखांच्या फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. काय घडलं नेमकं?

प्रसिद्ध गायक अदनान सामीविरोधात १७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
आपल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले आणि पाकिस्तानचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिक बनलेले गायक अदनान सामी (Adnan Sami) एका मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर १७.६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण २०२२ मधील असून, ग्वालियरमधील लावण्या सक्सेना नावाच्या महिलेने स्थानिक जिल्हा न्यायालयात अदनान सामी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. लावण्या सक्सेना यांनी एका संगीत कार्यक्रमासाठी अदनान सामी यांच्या टीमला ३३ लाख रुपये मध्ये बूक केलं होतं. हा कार्यक्रम २७ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्याचं ठरलं होतं.
कराराप्रमाणे, लावण्या यांनी आगाऊ रक्कम म्हणून १७ लाख ६२ हजार रुपये सामी यांच्या टीमला दिले होते. उर्वरित रक्कम कार्यक्रम झाल्यावर देण्याचं निश्चित झालं होतं. मात्र, काही दिवसांनंतर अदनान सामी यांच्या टीमने अचानक ठरलेला कार्यक्रम रद्द केला आणि तो नंतर करु, असं आश्वासन दिलं.
कार्यक्रम रद्द झाल्यानंतर लावण्या सक्सेना यांनी सामी यांच्या टीमकडे दिलेली रक्कम परत मागितली. मात्र, टीमने ही रक्कम परत देण्यास नकार दिला. यामुळे त्यांनी सामी यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे.
लावण्या सक्सेना यांनी या प्रकरणी इंदरगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने, त्यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. तिथेही निराशा मिळाल्यानंतर, अखेर त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. जिल्हा न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, इंदरगंज पोलीस ठाण्याला या प्रकरणातील अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.