Video: कॉन्सर्टमध्ये गात होती बॉलिवूड गायिका, अचानक चाहत्याने स्टेजवर येऊन तिचे दोन्ही पाय पकडले अन् पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:17 IST2025-12-08T17:16:15+5:302025-12-08T17:17:31+5:30
बॉलिवूड गायिकेसोबत धक्कादायक प्रसंग घडला आहे. चाहत्याने तिच्यासोबत गंभीर गैरवर्तन केले आहे. काय घडलं नेमकं?

Video: कॉन्सर्टमध्ये गात होती बॉलिवूड गायिका, अचानक चाहत्याने स्टेजवर येऊन तिचे दोन्ही पाय पकडले अन् पुढे...
'बेबी डॉल' आणि 'चिट्टियां कलाइयां' सारख्या सुपरहिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड गायिका कनिका कपूर एका लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान झालेल्या धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कनिका कपूर स्टेजवर गात असताना अचानक एका व्यक्तीने स्टेजवर प्रवेश केला आणि तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
काय घडलं नेमकं?
व्हायरल व्हिडीओनुसार, कनिका कपूर मेगोंग फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करत होती. ती गाणं गाण्यात पूर्णपणे मग्न असताना, गर्दीतून अचानक एक चाहता धावत स्टेजवर आला आणि त्याने कनिकाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने कनिकाच्या पायाला स्पर्श करुन तिला उचलण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार इतका अचानक घडला की कनिका क्षणभर गोंधळली आणि मागे फिरली.
कनिकासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या व्यक्तीला स्टेजवरील सुरक्षा रक्षकांनी लगेच पकडलं आणि त्याला खाली ओढलं. या संपूर्ण प्रकारानंतर कनिका कपूरने दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा होती. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती घाबरली असली तरी, तिने त्वरित स्वतःला सावरलं आणि आपला परफॉर्मन्स थांबवला नाही. काही क्षणांतच तिने पुन्हा गाणं सुरू केलं आणि शो पुढे नेला.
तिच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक होत आहे. अशा परिस्थितीतही शांत राहून परफॉर्मन्स सुरू ठेवल्याबद्दल चाहते तिच्या हजरजबाबी स्वभावाचं आणि व्यक्तिमत्वाचं कौतुक करत आहेत.
कनिका कपूरसोबत घडलेल्या या घटनेमुळे कलाकारांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गर्दीतून आलेल्या व्यक्तीला थेट स्टेजपर्यंत पोहोचणे कसे शक्य झाले, याबद्दल आयोजकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर टीका होत आहे. याशिवाय चाहत्यांनीही आवडत्या कलाकाराचा परफॉर्मन्स अनुभवताना असे अनुचित प्रकार करु नयेत, असं सर्वांचं मत आहे.