"तुमच्या चित्रपटात मला..."; 'धुरंधर २' बद्दल 'उझैर बलोच'ची पोस्ट चर्चेत, आदित्य धरविषयी काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 10:01 IST2026-03-22T10:00:23+5:302026-03-22T10:01:40+5:30
'धुरंधर २' मध्ये 'उझैर बलोच'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दानिश पंडोरने दिग्दर्शक आदित्य धर यांच्याबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.

"तुमच्या चित्रपटात मला..."; 'धुरंधर २' बद्दल 'उझैर बलोच'ची पोस्ट चर्चेत, आदित्य धरविषयी काय म्हणाला?
रणवीर सिंगचा 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे. केवळ तीन दिवसांत ३३९ कोटींचा गल्ला जमवून या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे कौतुक होत असतानाच, 'उझैर बलोच'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दानिश पंडोरने (Danish Pandor) दिग्दर्शक आदित्य धर यांच्याबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.
दानिश पंडोरने सोशल मीडियावर आदित्य धर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याने म्हटले आहे की, "आदित्य धर सर, मला तुमच्या या शानदार प्रकल्पाचा भाग बनवल्याबद्दल आणि मला 'उझैर'चे पात्र दिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुमच्यासोबत काम करणे हा केवळ एक अनुभव नव्हता, तर ती एक अशी भावना आहे जी मी आयुष्यभर जपून ठेवेन."
'धुरंधर २' चित्रपट १९ मार्च रोजी, म्हणजेच ईदच्या काही दिवस आधी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर दानिशने या यशाला आपली आजवरची 'सर्वोत्तम ईदी' (Best Eidi) म्हटले आहे. त्याने पुढे लिहिले, "माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि तुमच्या चित्रपटात मला एक सुंदर स्थान दिल्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहीन. लव्ह यू सर, ही माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ईदी आहे."
अशाप्रकारे दानिशने त्याची कृतज्ञता व्यक्त केली आहे. 'धुरंधर २' बद्दल सांगायचं झालं तर चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत, याशिवाय अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन यांच्या भूमिकांचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट लवकरच ५०० कोटींचा टप्पा पार करेल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. यापूर्वी ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने १३५० कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला होता.