"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:05 IST2025-10-30T12:04:32+5:302025-10-30T12:05:06+5:30
Mamta Kulkarni on Dawood Ibrahim :आता अनेक वर्षांनंतर ममता कुलकर्णीने दाऊद इब्राहिमचे नाव घेतले आहे. तिने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.

"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
नव्वदच्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, ज्यामुळे तिचे आयुष्य अनेक घोटाळे आणि अफवांमुळे डळमळीत झाले. तिच्या बोल्ड भूमिका आणि पडद्यावरील प्रेझेंसमुळे ममता कुलकर्णीची प्रसिद्धी झपाट्याने वाढली, पण त्याच वेगाने अंडरवर्ल्डशी असलेले तिचे संबंध आणि एका ड्रग्स प्रकरणात अडकल्यामुळे तिची प्रसिद्धी फिकी पडली.
ममता कुलकर्णीच्या आयुष्यातील सर्वात चर्चेत असलेल्या पैलूंपैकी एक म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबतचे तिचे कथित संबंध. १९९८ मध्ये राजनसोबतच्या तिच्या रिलेशनशीपच्या अफवा पसरू लागल्या, जो मीडियामध्ये चर्चेचा विषय बनला. 'चायना गेट' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या एका घटनेनंतर ममता कुलकर्णीचा अंडरवर्ल्डशी असलेला संबंध आणखी वाढला. राजकुमार संतोषीसोबत झालेल्या मतभेदानंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. परंतु, कथितरित्या राजनकडून धमक्या मिळाल्यानंतर ममता कुलकर्णी चित्रपटात परतली. चित्रपटाचे अपयश तिच्यासाठी मोठा धक्का होता आणि तिने संतोषीवर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
ममता कुलकर्णी दाऊदबद्दल म्हणाली...
आता अनेक वर्षांनंतर ममता कुलकर्णीने अंडरवर्ल्डच्या एका खूप मोठ्या डॉनचे नाव घेतले आहे. तिने म्हटले आहे की, ''दाऊद इब्राहिम कोणताही दहशतवादी नाही.'' ममता म्हणाली, ''दाऊद हा न कोणताही दहशतवादी आहे आणि न बॉम्बस्फोटासारख्या कोणत्याही घटनेत त्याचे नाव कधी आले आहे. मीडिया आणि काही राजकीय शक्तींनी एका षड्यंत्राखाली त्याला बदनाम केले आहे. कोणाला गुन्हेगार ठरवण्यासाठी आरोप सिद्ध होणे आवश्यक आहे, नुसता प्रचार केल्याने कोणी गुन्हेगार होत नाही.''
''दाऊदशी माझा काहीही संबंध नाही...''
तिने पुढे म्हटले, ''दाऊदशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. माझे नाव एका व्यक्तीसोबत जरूर जोडले गेले होते. पण तुम्ही बघा, त्याने कोणताही बॉम्बस्फोट केला नाही. देशात देशविरोधी काही केले नव्हते. ज्याच्यासोबत माझे नाव जोडले गेले, त्याने कधी बॉम्बस्फोट केला नाही. मी आयुष्यात कधीही दाऊदला भेटले नाही.''
२५ वर्षांनंतर ममता कुलकर्णी परतली भारतात
अभिनयातून संन्यास घेण्यापूर्वी, ममता कुलकर्णी शेवटची २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कभी तुम कभी हम' या चित्रपटात रुपेरी पडद्यावर दिसली होती. एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा असलेल्या ममता कुलकर्णीने २००० कोटींच्या अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये तिचा कथित सहभाग आणि ड्रग माफिया विकी गोस्वामीसोबत लग्नाच्या अफवांनंतर देश सोडला होता. या प्रकरणातून तिची सुटका झाल्यानंतर ती २५ वर्षांनंतर २०२४ च्या शेवटी भारतात परतली.