प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 09:23 IST2025-10-24T09:21:03+5:302025-10-24T09:23:06+5:30
धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार सचिनला अटक करण्यात आली आहे

प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार जोडी सचिन-जिगर यांच्यापैकी संगीतकार सचिन संघवीला एका १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे. तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, सचिन संघवीवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे विलेपार्ले पोलिसांनी सचिनला बेड्या ठोकल्या आहेत. काय आहे नेमकं प्रकरण?
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणीने म्हटलं आहे की, २०२४ मध्ये इन्स्टाग्रामवर सचिन संघवीची त्या तरुणीशी ओळख झाली. 'तुला संगीत अल्बममध्ये काम देतो', असं आश्वासन सचिनने त्या तरुणीला दिलं होतं. पुढे या कामाच्या निमित्ताने भेटीगाठी वाढल्यानंतर, सचिनने तिला लग्नाचं वचन दिलं. पण पुढे लग्नाचं आमिष दाखवून सचिनने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.
तरुणीने केलेल्या तक्रारीत असाही आरोप करण्यात आला आहे की, सचिन संघवीने तरुणीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडलं. तरुणीच्या तक्रारीवरून विलेपार्ले पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण सांताक्रूझ पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आलं. अखेर पोलिस तपासानंतर सचिन संघवीला अटक करण्यात आली. मात्र, अटकेनंतर काही तासातच सचिनला जामिनावर सोडण्यात आलं. सचिन संघवी हा मूळचा गुजरातमधील असून, त्याने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिलं आहे.