लॉस अँजिलिसमध्ये आगीमुळे हाहाकार, प्रीती झिंटाने व्यक्त केली चिंता, म्हणते- "लवकरात लवकर हे सगळं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:57 IST2025-01-12T14:50:56+5:302025-01-12T14:57:19+5:30

अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच आहे.

bollywood actress preity zinta gets emotional about america los angeles wildfires shared post says i never thought | लॉस अँजिलिसमध्ये आगीमुळे हाहाकार, प्रीती झिंटाने व्यक्त केली चिंता, म्हणते- "लवकरात लवकर हे सगळं..."

लॉस अँजिलिसमध्ये आगीमुळे हाहाकार, प्रीती झिंटाने व्यक्त केली चिंता, म्हणते- "लवकरात लवकर हे सगळं..."

Preity Zinta: अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच आहे. कॅलिफोर्नियातील लॉस अँजिलिसमध्ये पसरलेल्या या वणव्याने (Fire) रौद्र रूप धारण केले आणि त्यानंतर तेथील अनेक शहरे, वस्त्या जळून खाक झाल्या. झाडांचा कोळसा तर झालाच, शिवाय घरेच्या घरेच राख झाली. या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉसअँजिलिस हे हॉलिवूड सेलिब्रिटींचे घर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी लागलेली आगीमुळे मोठं नुकसान झालं आहे. अलिकडेच अभिनेत्री प्रियंका चोप्राने लॉस अँजिलिसमधील आगीच्या भयानक परिस्थितीची दृश्ये दाखवत तिच्या चाहत्यांना माहिती दिली. त्यानंतर आता या घटनेवर आता अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली आहे. 

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजिलिसमध्ये सध्या आगीमुळे हाहाकार उडाला आहे. याचा फटका सर्वसामन्यांसह सेलिब्रिटींनाही बसला आहे. यावर अभिनेत्रीने प्रीती झिंटाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तेथे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीबद्दल सांगितलं आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटलंय, "मी कधीच विचार केला नव्हता की हा दिवस बघण्याची वेळ माझ्यावर येईल. आगीमुळे आमच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे नष्ट होईल. यामुळे माझ्या काही मित्र-मंडळींना त्यांचं राहतं घर सोडावं लागलं तर काहींच्या कुटुंबीयांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धूर तसेच सर्वत्र पसरणारे आगीचे लोट आणि आकाशातून बर्फाप्रमाणे राख पडते आहे. त्यामुळे हवा जर थांबली नाही तर पुढे काय होईल? याची भीती आहे. कारण आमच्यासोबत दोन लहान मुले आणि त्यांचे आजी-आजोबा देखील आहेत."

पुढे अभिनेत्री म्हणते, "माझ्या आजूबाजूला झालेलं नुकसान पाहून मी खूपच दु:खी आहे. पण, आम्ही सुरक्षित आहोत त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. ज्या लोकांना आगीमुळे आपलं घर सोडावं लागलं किंवा या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलंय, त्यांचं दु:खं मी समजू शकते. लवकरात लवकरच हे सगळं थांबावं आणि आगीवर नियंत्रण मिळवता यावं, अशी मी देवाकडे प्रार्थना करते." अशी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे. 

दरम्यान, प्रीती झिंटा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली. आपला नवरा आणि दोन मुलांसमवेत ती तिथे वास्तव्यास आहे. परंतु काही दिवसांपासून अमेरिकेत सुरु असलेल्या या आगीच्या घटनेमुळे अभिनेत्रीचे चाहते देखील चिंतेत होते. अखेर सोशल मीडियाद्वारे प्रीतीने तिच्या सुरक्षेबाबत माहिती दिली आहे.

Web Title: bollywood actress preity zinta gets emotional about america los angeles wildfires shared post says i never thought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.