'मणिकर्णिका'ची ऑफर नाकारल्यामुळे कंगनाने धरला अबोला? सोनू सूद म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:15 IST2025-01-10T14:11:40+5:302025-01-10T14:15:22+5:30
'मणिकर्णिका'ची ऑफर नाकारल्यामुळे कंगना राणौत अन् सोनू सूदच्या मैत्रीत पडली फूट? अभिनेत्याने खरं काय ते सांगितलंच.

'मणिकर्णिका'ची ऑफर नाकारल्यामुळे कंगनाने धरला अबोला? सोनू सूद म्हणाला...
Sonu Sood: सोनू सूद (Sonu Sood) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रेक्षकांमध्ये तो 'गरिबांचा मसिहा' म्हणून ओळखला जातो. सध्या सोनू सूद त्याचा आगामी चित्रपट फतेहमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. आज १० जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सोनू सूदने त्याच्या आणि कंगना राणौतच्या मैत्रीवर भाष्य केलं. शिवाय त्याने कंगणाची 'मणिकर्णिका' चित्रपटाची ऑफर का नाकारली यामागचं कारणही सांगितलं.
नुकतीच सोनू सूदने शुभंकर मिश्रा यांच्या युट्यूब चॅनेलल्या दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौत आणि त्याच्या मैत्रीच्या नात्याबद्दल बोलला. त्यावेळी मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सांगितलं की कंगना राणौत आणि तो आता फारसे संपर्कात नाहीत. त्याचबरोबर त्याने 'मणिकर्णिका' चित्रपटासाठी नकार देण्यापूर्वी त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती, असंही म्हटलं. त्या दरम्यान मुलाखतीत सोनू सूद म्हणाला, "कंगना आणि माझ्या मैत्रीसाठी मी 'मणिकर्णिका' चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. आता आमचं बोलणंच होत नाही. परंतु तिच्या आई-वडील आणि बहिणीसोबत माझा चांगला बॉण्ड आहे. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. माझा स्वभावच असा आहे की जर मी कोणासोबत मैत्री केली असेल किंवा कोणासोबत माझं काही बिनसलं असेल तरीही मी त्या व्यक्तीच्या विरोधात बोलत नाही."
पुढे अभिनेत्याने सांगितलं, "लोक काहीही बोलतील पण, मी कोणाच्याही पाठीमागे त्यांच्याबद्दल बोलत नाही. मला फक्त याच गोष्टीचं टेन्शन येतं की, एकेकाळी मैत्री जपणारा माणूसच आज आपल्या विरोधात बोलत आहे. मला मान्य आहे कोणीच वाईट नसतं. परंतु आपण कधी-कधी काही बोलून जातो, एखाद्याच्या विरोधात लिहितो, या सगळ्या गोष्टी आपण विचारपूर्वक केल्या पाहिजेत. मी हे सगळं अनुभवलं आहे आणि मी बरंच काही केलंय. परंतु मला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होत नाही. म्हणून कोणी काही म्हटलं तर त्यावर उत्तर देणं मला गरजेचं वाटत नाही."