डेब्यू सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी शनाया कपूरच्या हाती आणखी एक प्रोजेक्ट; सेटवरील पहिला फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:40 IST2025-03-13T16:37:41+5:302025-03-13T16:40:57+5:30
अभिनेते संजय कपूर यांची लेक शनायाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

डेब्यू सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी शनाया कपूरच्या हाती आणखी एक प्रोजेक्ट; सेटवरील पहिला फोटो समोर
Shanaya Kapoor: अभिनेते संजय कपूर यांची लेक शनायाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सध्या शनाया कपूर तिचा आगामी सिनेमा 'तू या मैं' मुळे चर्चेत आहे. अलिकडेच तिच्या या डेब्यू फिल्मचा टीझर रिलीज करण्यात आला. त्यामुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. जेन झी वाईब्स देणाऱ्या या चित्रपटात शनाया एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहे. परंतु, डेब्यू सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच अभिनेत्रीला आणखी एका नव्या प्रोजेक्टची ऑफर करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे.
दरम्यान, शुजात सौदागर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या नव्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो पोस्ट केला आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. शुजात सौदागर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. शनायाने देखील इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी सिनेमाच्या सेटवरील पहिला फोटो पोस्ट केल्याचा पाहायला मिळतोय. शनायाने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका हातात क्लिपबोर्ड आणि त्या क्लिपबोर्डवर 'जेसी' असं लिहिलेलं दिसत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुजात यांनी या फोटोसोबत शनाया कपूर आणि अभय वर्मा यांनी टॅग देखील केलं आहे. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये शनाया आणि अभय वर्मा ही फ्रेश जोडी झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आणखी एका स्टारकिडबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
'तू या मैं' शिवाय शनाया कपूरने ऑंखों की गुस्ताखिया सिनेमाचं शूट देखील पूर्ण केलं आहे. या सिनेमात अभिनेत्री विक्रांत मेस्सीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.