"मी जिवंत आहे..."; सोशल मीडियावर निधनाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर भडकले रजा मुराद, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:43 IST2025-08-23T11:37:50+5:302025-08-23T11:43:01+5:30
सोशल मीडियावर मृत्यूची अफवा पसरवणाऱ्यांवर रजा मुराद संतापले, म्हणाले...

"मी जिवंत आहे..."; सोशल मीडियावर निधनाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर भडकले रजा मुराद, म्हणाले...
Raza Murad: आपल्या खलनायिकी भूमिकांमुळे ८०-९० चा काळ गाजवणारे अभिनेते म्हणजे रजा मुराद (Raza Murad). हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका गाजली. यात खासकरुन त्यांच्या खलनायिकी भूमिकांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. आपल्या भारदस्त आवाजामुळे इंडस्ट्रीत स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या रजा मुराद यांनी 'एक नजर', 'रोटी कपड़ा और मकान', 'नालायक', 'जानी दुश्मन', 'प्रेम रोग', 'राम तेरी गंगा मैली' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं होतं. सध्या रजा मुराद एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत . हल्ली अनेकजण सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत कलाकारांबद्दल अफवा पसरवतात. रजा मुराद यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या...
Actor Raza Murad files police complaint over "false death rumours"
— ANI Digital (@ani_digital) August 22, 2025
Read @ANI Story | https://t.co/J2VPNvzwIT#RazaMurad#Mumbai#DeathRumourspic.twitter.com/GmFVcdUIGm
दरम्यान, सोशल मिडीयावर रजा मुराद यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली. याप्रकरणी त्यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर मृत्यूबद्दलच्या बनावट पोस्टविरुद्ध अभिनेता रजा मुराद यांनी शुक्रवारी मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात ही अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या अफवेमुळे आपल्याला खूप त्रास झाला आहे आणि त्यांना वारंवार स्पष्ट करावं लागत आहे की ते जिवंत आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात एएनआय सोबत बोलताना रजा मुराद म्हणाले, "कोणीतरी सोशल मीडियावर माझं निधन झाल्याची खोटी बातमी पसरवली. अशा लोकांची मानसिकता खूप संकुचित असते आणि त्यांना आयुष्यात कोणीही चांगलं काम केलेलं पाहावत नाही. मी आता याकडे दुर्लक्ष करणार नाही. शांत राहिलो की लोकं गैरसमज करुन घेतात. याबाबत आता मी अधिकृत तक्रार दाखल केली आहे."
पुढे ते म्हणाले, "मी जिवंत आहे हे लोकांना सांगून माझा घसा, जीभ आणि ओठ अक्षरश: सुकले आहेत. या अफवेमुळे मला जगभरातून लोकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत. शिवाय अनेकजण मलासोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट देखील पाठवत आहेत. ज्याने कोणी हे केलं आहे त्याची मानसिकता खूप वाईट असावी. त्याने त्याच्या आयुष्यात कधीही काहीही महत्त्वाचे साध्य केलेलंं नाही. म्हणूनच त्याला अशा गोष्टी करण्यात मजा येते." असं म्हणत त्यांनी खोटी माहिती पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.