पंतप्रधान मोदींनी घेतला मिथुनदांचा क्लास; 'या' कारणामुळे फोनवरुन केली कानउघडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 11:49 IST2024-02-13T11:48:35+5:302024-02-13T11:49:05+5:30
Mithun chakraborty: ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे मिथुन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकताच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

पंतप्रधान मोदींनी घेतला मिथुनदांचा क्लास; 'या' कारणामुळे फोनवरुन केली कानउघडणी
बॉलिवूडचा डिस्को डान्सर अर्थात अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे मिथुन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकताच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी त्यांच्या प्रकृतीचे अपडेट दिले आहेत. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन चांगलं खडसावल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी मिथुन यांच्या छातीत अचानक दुखू लागल्यामुळे त्यांना तातडीने कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर सोमवारी दुपारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रकृतीचे अपडेट चाहत्यांना दिले आहेत.
काय म्हणाले मिथुन चक्रवर्ती?
"मी पूर्णपणे बरा आहे. फक्त मला माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. पण, मी लवकरच कामाला सुरुवात करणार आहे. कदाचित उद्यापासूनच", असं मिथुन म्हणाले. सोबतच पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) खडसावल्याचंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी घेतला क्लास
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मला फोन केला होता. यावेळी त्यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी केली. सोबतच, मी तब्येतीची काळजी घेत नसल्यामुळे मला ओरडले सुद्धा," असं मिथुन यांनी सांगितलं.