"नादानिया खूप वाईट होता, त्यामुळे..."; इब्राहिम अली खानने स्वतःच्याच सिनेमावर केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 10:53 IST2025-10-20T10:44:52+5:302025-10-20T10:53:00+5:30
इब्राहिम अली खानने नादानिया या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पण आता याच सिनेमावर इब्राहिमने राग व्यक्त केला आहे

"नादानिया खूप वाईट होता, त्यामुळे..."; इब्राहिम अली खानने स्वतःच्याच सिनेमावर केली टीका
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांचा मुलगा इब्राहिम अली खानने (Ibrahim Ali Khan) नुकताच त्याच्या अभिनयाच्या पदार्पणाबद्दल एक मोठा आणि स्पष्ट खुलासा केला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या त्याचा पहिल्या चित्रपट 'नादानिया'बद्दल बोलताना इब्राहिमने तो चित्रपट "खरंच खूप वाईट" होता, अशी प्रांजळ कबुली दिली आहे. काय म्हणाला अभिनेता?
'एस्क्वायर इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत इब्राहिमने 'नादानिया' हा चित्रपट अत्यंत वाईट होता हे स्पष्टपणे मान्य केलं आहे. या चित्रपटामुळे सोशल मीडियावर त्याच्या अभिनयावर, विशेषत: संवादफेकीवर खूप टीका झाली आणि त्याला सतत ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगमुळे लोकांमध्ये त्याच्या अभिनय पदार्पणाबद्दल जी उत्सुकता होती ती कमी झाली, असं तो म्हणाला.
पहिल्याच सिनेमासाठी जे ट्रोलिंग झालं त्याचा नकारात्मक परिणाम झाला असला तरी, तो भविष्यासाठी आशावादी आहे. "जर मी भविष्यात एखादा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला, तर मला प्रेक्षकांकडून त्याच प्रमाणात प्रशंसा आणि प्रेम देखील हवं आहे, ज्या प्रमाणात माझ्यावर टीका झाली होती," असं मत त्याने व्यक्त केलं.
इब्राहिमने खुलासा केला की, तो सध्या त्याच्या संवादफेकीवर खूप मेहनत करत आहे. फक्त २१ वर्षांचा असताना त्याने 'नादानिया' चित्रपटाची शूटिंग सुरू करून घाई केली, अशीही त्याला जाणीव झालीये. त्याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झाल्यास, 'नादानियाँ' नंतर त्याने 'सरजमीन' (Sarzameen) या चित्रपटात अभिनय केला. यानंतर तो कुणाल देशमुख यांच्या आगामी 'दिलेर' (Diler) या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात झळकणार आहे. एकूणच इब्राहिमने आपल्या कामाबद्दल दिलेलं स्पष्ट आणि प्रामाणिक मत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे.